गुरुतत्त्वयोग विश्वाच्या अस्तित्वाचा गाभा
By admin | Published: July 17, 2017 04:26 AM2017-07-17T04:26:56+5:302017-07-17T04:26:56+5:30
निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला काहीतरी शिकवत असतो. गुरुतत्त्व प्राणिमात्रांना मार्गदर्शन करते. त्या मार्गदर्शनाचा ते अवलंब करतात
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला काहीतरी शिकवत असतो. गुरुतत्त्व प्राणिमात्रांना मार्गदर्शन करते. त्या मार्गदर्शनाचा ते अवलंब करतात आणि त्यामुळे ते सहजीवन जगू शकतात; परंतु या निसर्गाचे मार्गदर्शन मानवाला स्वीकारता येत नाही. जीवनात सुखी राहण्यासाठी मानवाने गुरुतत्त्व प्रणालीचा अवलंब केला पाहिजे. गुरुतत्त्वयोग जीवनप्रणाली ही या विश्वाच्या अस्तित्वाचा गाभा आहे, असे मत गुरुतत्त्वयोग प्रणालीचे
प्रणेते अभयकुमार सरदार यांनी व्यक्त केले.
गुरुतत्त्वयोग संस्थेतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुतत्त्वाची महती सांगणाऱ्या गुरुतत्त्ववेध स्मरणिकेचे प्रकाशन फर्ग्युसन महाविद्यालया जवळील गुरुतत्त्वयोग संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी संस्थेचे प्रमुख विश्वस्त श्रीकृष्ण चितळे, सुनील पाठक, हेमलता मांडे, तेजा दिवाण, संदीप दिवाण उपस्थित होते. या वेळी प्राणी व पक्ष्यांचे सामुदायिक सहजीवन हे प्रदर्शन संस्थेच्या आवारात आयोजित केले होते; तसेच साधकांनी गुरुतत्त्वाविषयी त्यांना आलेल्या अनुभवांचे कथन केले.
ते पुढे म्हणाले, ‘आज गुरुतत्त्वप्रणालीची खरी गरज तरुणांना आहे. वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये ताण-तणाव वाढत आहे. कोणतीही कृती करण्यापूर्वी मन शांत असले पाहिजे. ही शांती मिळविण्यासाठी या साधनेचा त्यांना नक्की उपयोग होईल. ’