उत्तम सहकलाकार, मित्र गमावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:08 AM2020-12-07T04:08:44+5:302020-12-07T04:08:44+5:30
- दिलीप प्रभावळकर पुणे -रवी पटवर्धन एक उत्तम सहकलाकार आणि मित्र होता. काही दिवसांपूर्वीच त्याच्याशी फोनवर बोलणे झाले ...
- दिलीप प्रभावळकर
पुणे -रवी पटवर्धन एक उत्तम सहकलाकार आणि मित्र होता. काही दिवसांपूर्वीच त्याच्याशी फोनवर बोलणे झाले होते. तब्येत हळूहळू सुधारत आहे, असे त्याने सांगितले. त्यामुळे त्याच्या निधनाची अचानक बातमी आल्यावर मोठा धक्का बसला. रंगभूमीचा बदलत गेलेला काळ, स्वरुप, प्रेक्षकांची बदललेली अभिरुची, कलाकार याचा तो साक्षीदार होता. या सर्व अनुभवांचे शब्दांकन व्हावे, त्यातून महत्वाचा दस्तावेज तयार व्हावा, असे कायम बोलणे व्हायचे. त्यावर रवीने कामही सुरु केले होते. मात्र, दुर्देवाने ते काम अपुरे राहिले.
रत्नाकर मतकरी दिग्दर्शित ‘अरण्यक’ या नाटकाचे दोन वर्षांपूर्वी पुनरुज्जीवन झाले. त्यापूर्वी १९७४ साली महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये मतकरी यांच्याच दिग्दर्शनाखाली ‘अरण्यक’ सादर झाले होते. मी, रवी पटवर्धन आणि प्रतिभा मतकरी यांनी त्यात भूमिका साकारली होती. ‘अरण्यक’ आणि सतीश आळेकर यांचे ‘महानिर्वाण’ या दोन्ही नाटकांना त्यावेळी विभागून पारितोषिक मिळाले होते. त्यानंतर तब्बल ४४ वर्षांनी ‘अरण्यक’ पुन्हा रंगमंचावर आले. मी, रवी आणि प्रतिभा वगळता इतर टीम पूर्णपणे नवी होती. रवीने त्यावेळीही धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती आणि ४४ वर्षांनी तीच भूमिका हुबेहूब साकारली. त्याची आताची भूमिका मला जास्त भावली, प्रभावी वाटली. गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवाचे प्रतिबिंब परिणामकारक भूमिकेत पहायला मिळाले. ‘अरण्यक’ नाटक थांबूनही एक वर्ष होऊन गेले. तरी आम्ही सातत्याने संपर्कात होतो.
रवी मला सिनियर असला तरी आम्ही बालनाट्य, प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर अनेक वर्षे एकत्र काम केले. मध्यंतरी एका मुलाखतीत तो म्हटला होता की, ‘मला पुर्नजन्म मिळाला तर ‘बेकेट’मधील राजाची भूमिका आणि ‘अरण्यक’मधील धृतराष्ट्राची भूमिका परत करायला आवडेल.’ त्याने रंगभूमीवर जवळपास ७७ वर्षे काम केले. वयाच्या सातव्या वर्षापासून त्याच्या अभिनयाला सुरुवात झाली. अगदी अलीकडे ‘अगंबाई सासूबाई’ या मालिकेमध्येही त्याने काम केले.
----------------
जयप्रकाश नारायण यांच्या ‘डायरी’चे एकपात्री प्रयोग
रवीची एक अत्यंत दुर्मीळ आठवण त्याने मला अलीकडेच सांगितली होती. आणीबाणीनंतर जयप्रकाश नारायण यांनी ‘डायरी’ लिहिली होती. त्याचे भाषांतर पु.ल.देशपांडे यांनी केले होते. रवी पटवर्धनने या डायरीचे बरेच एकपात्री प्रयोग केले. दिग्गज संगीत दिग्दर्शक जयदेव यांनी या एकपात्री प्रयोगाला विनामूल्य पार्श्वसंगीत दिले होते. यासाठी पं. शिवकुमार शर्मा, पं. हरिप्रसाद चौरसिया आणि झरीन दारुवाला यांनी वादन केले होते.