उत्तम साहित्यानेच देश महासत्ता बनेल - प्रा. मिलिंद जोशी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 03:29 AM2019-03-19T03:29:31+5:302019-03-19T03:31:19+5:30
आपला देश केवळ उत्तम तंत्रज्ञानाने नाही तर उत्तम साहित्यानेच महासत्ता होणार आहे, असे प्रतिपादन मसाप पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.
पुणे : आज पालक वाचत नाहीत म्हणून मुलेही वाचत नाहीत. आपली आजची मुले हीच पुढचे भविष्य आहेत. तेच हा देश महासत्ता बनविणार आहेत. त्यासाठी आज उत्तम साहित्याची निर्मिती होण्याची आवश्यकता आहे. आपला देश केवळ उत्तम तंत्रज्ञानाने नाही तर उत्तम साहित्यानेच महासत्ता होणार आहे, असे प्रतिपादन मसाप पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेतर्फे प्रतिवर्षी श्रीनिवास रायते गुरुजी राज्यस्तरीय बालसाहित्यिक पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे वितरण प्रा. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावर्षी पुण्याच्या बालसाहित्यिका
आश्लेषा महाजन यांना रविवारी सभारंभपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सन्मानपत्र, शाल, श्रीफल आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर आकाशवाणी केंद्राचे सहायक संचालक सुनील शिनखेडे होते. याप्रसंगी व्यासपीठावर मधुसूदन रायते, मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, कार्याध्यक्षा सायली जोशी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात अमित कामतकर यांचा पुस्तक लिखाणाबद्दल, रामचंद्र धर्मसाले यांचा साने गुरुजी कथामालेवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल आणि कल्याणराव शिंदे यांची विभागीय साहित्य संमेलनाच्या निमंत्रकपदी निवड झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक सोलापूरचे अध्यक्ष मसाप जुळे पद्माकर कुलकर्णी यांनी केले. मानपत्राचे वाचन प्रमुख कार्यवाह गिरीश दुनाखे यांनी केले. श्रीकांत कुलकर्णी, मधुसूदन रायते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. स्वानंदी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाह संदीप कुलकर्णी यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या निधनानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
आज वडीलधारीही वाचत नाहीत...
प्रा. जोशी म्हणाले, आज जीवनात खूप बदल होत आहेत. नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. एका प्रश्नाची अनेक उत्तरे येत आहेत. मुलांच्या हातात पुस्तकांऐवजी तंत्रज्ञान येत आहे. त्यामुळे वाचन होत नाही यासाठी शिक्षकांनी मुलांमध्ये साहित्याची गोडी निर्माण करण्याची आवश्यकता आहे. याशिवाय आज घराघरातून वडीलधारी मंडळीही वाचत नाहीत.
वडीलधारी मंडळीच जर वाचत नसतील मुले तर कशी वाचणार, असा साहजिकच प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे वडीलधारी मंडळींनी वाचले पाहिजे. आश्लेषा महाजन यांनी आपल्या मनोगतात दर्जेदार बालसाहित्य निर्माण होण्याची गरज आहे. त्याचे लिखाण साधे आणि सोपे असावे. लहानांसाठी आज लिहिण्याची गरज आहे. तसेच त्याच्यासारखा दुसरा आनंद नसल्याचे सांगितले.