दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत कोरोनाचा हाहा:कार ; पण मुळशीतील ९ गावांनी कोरोना रोखला सीमेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 05:38 PM2021-05-22T17:38:48+5:302021-05-22T18:45:13+5:30
आत्तापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही.
पिरंगुट : संपूर्ण जगभर हाहा:कार माजविला असताना भारतामध्ये सुध्दा दिल्लीपासून गल्लीपर्यंत कोरोनाने थैमान घातले आहे. परंतु, पुण्यात तर पहिल्यापासूनच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता राहिला आहे. मात्र, याच कोरोना वरती मुळशी तालुक्यातील नऊ गावांनी वर्चस्व प्राप्त केले आहे. कारण आतापर्यंत तरी मुळशी तालुक्यातील या नऊ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही.
महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना मुळशी तालुक्यातील काही गावांनी मात्र योग्य नियोजनाच्या जीवावर कोरोनाला गावापासून दूरच रोखले आहे.यामध्ये आंबेगाव,डावजे,संबवे,वडगाव-वाघवाडी,वारक,ताम्हिणी,असदे-वेडे-भोडे व पोमगाव या नऊ गावांनी कोरोनावरती वर्चस्व मिळविले असून गेल्या वर्षीच्या कोरोनाच्या पहिल्या लाटे पासून ते आत्ता पर्यंत च्या दुसऱ्या लाटे पर्यंत या गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह चा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. महत्वाचे म्हणजे या गावांमध्ये असलेले गावचे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,पोलिस पाटील,अंगणवाडी सेविका,शिक्षिका राजकीय-सामाजिक शेतकरी वर्ग या सर्वांनी मिळून 'माझे गाव माझी जबाबदारी' या धोरणावर भर देत आपल्या गावामध्ये कोणाला कोरोना होणार नाही याची विशेष काळजी घेतली आहे. यामुळेच कोरोनाच्या महाभयंकर अशा पहिल्या व दुसर्या लाटेमध्ये सुद्धा ही नऊ गावे अजून ही कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहिली आहेत.
या सर्व नऊ गावांच्या यशामध्ये आंबेगावचे ग्रामसेवक पूजा शिंदे,सरपंच उषा नानासाहेब मारणे,उपसरपंच तानाजी मारणे,डावजेचे ग्रामसेवक मोना सपकाळ,सरपंच रामदास मानकर,संबवेगावचे ग्रामसेवक वासनिक,सरपंच रेश्मा जोरी,उपसरपंच हनुमंत जोरी,वडगाव वाघवाडी ग्रामसेवक प्रशांत सूर्यवंशी सरपंच अर्चना वाघ,वारकचे ग्रामसेवक नीलिमा भुजबळ सरपंच शिल्पा पोकळे,ताम्हिणी-आदरवाडीचे ग्रामसेवक भरत शिरसाट सरपंच प्रियंका मरे उपसरपंच योगेश बामगुडे,असदेचे ग्रामसेवक लक्ष्मण साळवी सरपंच नरेश भरम,वेडे-भोडेचे ग्रामसेवक बी. टी.पाटील,सरपंच संगीता मारणे,पोमगावचे ग्रामसेवक तुकाराम मोरे, सरपंच सारिका ढोरे या सर्वांचे व ग्रामपंचायत सदस्य व इतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा महासंघाचे सल्लागार हनुमंत सुर्वे यांनी सांगितले की, या सर्व गावांचा शासन दरबारी आम्ही पाठपुरावा करुन महाराष्ट्र शासन ग्रामपंचायत विभाग,जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच तहसीलदार व पंचायत समिती यांच्यावतीने सन्मानित करण्याचा प्रयत्न करणार आहे.