बारामती तालुक्यातील जगताप दाम्पत्याचा निर्णय लयभारी; कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणाची स्विकारली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 09:54 PM2021-06-11T21:54:28+5:302021-06-11T21:55:14+5:30
दहावीपर्यंत गणवेश, दप्तर वह्या-पुस्तकांसह देणार मोफत शिक्षण
सांगवी : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांना मृत्यू ओढावला. कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्याने अनेकांच्या घराचा आधार हिरावला गेला. काही ठिकाणी संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित झाले. त्यातील काही कुटुंबांत घरातील कर्त्यां व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांवर संकट कोसळले. यामध्ये अनेक अल्पवयीन मुले माता-पित्याच्या मायेला पोरकी झाली. त्यांचा जगण्याचा आधार हिरावला गेल्याने या मुलांचा प्रश्न गंभीर झाला.
आई वडिलांचे छत्र हरविल्याने अनाथ झालेल्या मुलांचे उदरनिर्वाहासहित विविध प्रश्न घेऊन ऐरणीवर आला. याबाबत राज्य शासनाने देखील अशा मुलांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक जबाबदारी घेण्याबाबत निर्णय घेतला. आपण देखील खारीचा वाटा घ्यावा या हेतूने आई वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेण्याचा निर्णय बारामती तालुक्यातील पणदरेच्या जगताप दाम्पत्याने घेतला आहे. विनोद जगताप,स्वरांजली जगताप असे या दाम्पत्याचे नाव आहे.
पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे सचिव विनोद जगताप व जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यमच्या मुख्याध्यापक स्वरांजली जगताप या दांपत्यांनी ज्या मुलांचे पालक कोरोना महामारीमुळे मृत्यू झाले आहेत अशा मुलांचे शैक्षणिक पालकत्व जबाबदारी स्वीकारली आहे. या मुुलांना बारामती तालुक्यातील जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम भिकोबानगर येथे दहावीपर्यंत गणवेश,दप्तर,वह्या पुस्तके देऊन मोफत शिक्षण देण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तर सध्या अशा मुलांच्या शिक्षणासाठी जगताप यांच्याकडे कोरोनात मरण पावलेल्यांचे नातेवाईक संपर्क साधत आहेत. आई- वडिलांचे छत्र हरविलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी संपर्क साधण्याचे आवाहन जगताप दाम्पत्याने केले आहे.
...........
कोरोनासारख्या महाभंयकर संकटात अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. आई-वडिलांच्या मृत्यूने अनेक मुले पोरकी झाली. समाजाचे आपण देणे असतो या हेतूने अशा मुलांना आपल्या हातून एखाद्या कुटुंबाला हातभार लागला तर भविष्यात मोठे अधिकारी होतील.या सारखे आमच्या दाम्पत्यासाठी आयुष्यात दुसरे कोणतेच समाधान असणार नाही.-
विनोद जगताप, सचिव, पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेड