स्वातंत्र्यानंतर देशात खूप विकास : जावेद अख्तर; पुण्यात ‘शब्दोत्सव’ साहित्यिक महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:34 PM2018-02-05T12:34:53+5:302018-02-05T12:36:49+5:30
‘फिक्की फ्लो’चा पुणे विभाग आणि सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठातर्फे आयोजित ‘शब्दोत्सव’ या साहित्यिक महोत्सवाचे गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
पुणे : स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात काहीच झाले नाही, असे कोण म्हणते?... या देशात स्वातंत्र्यानंतर खूप काही चांगले झाले आहे. विज्ञान-तंत्रज्ञान, उद्योग, अवकाश संशोधन अशा अनेक क्षेत्रांत आपण खूप पुढे गेलो आहोत. आज मुसमुसलेल्या महत्त्वाकांक्षांनी आपली अनेक स्वप्नं पूर्ण करणारा, स्वत:च्या हक्काची कार फिरवणारा मध्यमवर्ग हा या देशात आजवर झालेल्या विकासाचीच तर निष्पत्ती आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी टीकाकारांना सुनावले. चे
‘फिक्की फ्लो’चा पुणे विभाग आणि सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाने आयोजित केलेल्या ‘शब्दोत्सव’ या साहित्यिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी अख्तर बोलत होते. केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री बाबूल सुप्रियो, डॉ. शां. ब. मुजुमदार, वर्षा चोरडिया, डॉ. रजनी गुप्ते, सबिना संघवी, डॉ. विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते.
‘आपल्याला जे हवे, ते मिळवणे अशक्य नाही; फक्त ते मिळवण्याची चिकाटी आपण सोडता कामा नये, हे मी या ठिकाणी सांगेन. या शब्दोत्सवात मी इतरांसारखा भाषण देण्याचा प्रयत्न करेन, पण एक राजकारणी असल्यामुळे मी हे प्रॉमिस पूर्ण करीलच असे नाही, हेही तुम्ही लक्षात असू द्या...’ असे बोलून आणि उपस्थित तरुणांत काही वेळ हशा पिकवून सुप्रियो यांनी आपले भाषण आवरते घेतले.