प्रचंड परिश्रम अन् गाठलं यशाचं शिखर; बारामतीच्या युवकाचा ऑस्ट्रेलियात डंका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 03:04 PM2023-05-16T15:04:21+5:302023-05-16T15:04:30+5:30
वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी अतिशय खडतर स्पर्धा पुर्ण करणारा अवधुत हा राज्यातील पहिला युवक ठरला
बारामती : बारामती शहरातील २१ वर्षीय अवधूत सुधीर शिंदे या विद्यार्थ्याने आॅस्ट्रेलियात झालेली अतिशय खडतर अल्ट्रामॅन स्पर्धेत यश संपादन केले आहे. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी अतिशय खडतर स्पर्धा पुर्ण करणारा अवधुत हा राज्यातील पहिला युवक ठरणार आहे. जगातील सर्वात अवघड असणाऱ्या या स्पर्धेत शारिरीक आणि मानसिक क्षमतेचा कस लागतो. आयर्नमॅन व अल्ट्रामॅन अशा दोन्ही स्पर्धा पूर्ण करणारा अवधूत शिंदे हा पहिलाच बारामतीकर ठरला आहे.
यापूर्वी कझाकस्तान येथे २०२२ मध्ये झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत त्याने सहभाग घेत यश संपादन केले होते. शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकीच्या तिस-या वर्षात तो सध्या शिक्षण घेत आहे. तीन दिवसात प्रत्येकी बारा तास या प्रमाणे ही स्पर्धा होते. यात दहा कि.मी. स्विमींग, ४२१ कि.मी. सायकलींग व ८४ कि.मी. धावणे यांचा समावेश आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून खडतर स्पर्धेसाठी अवधूतचा कसुन सराव सुरु होता. दर रविवारी २५० कि.मी. सायकलिंग तो सराव करत होता. स्विमींग, सायकलींग व रनिंग अशा तिन्ही बाबींवर त्याने सराव करत काम केले होते. या साठी त्याने रात्रीचा दिवस करत प्रचंड परिश्रम घेतले. बारामती सायकल क्लबचे प्रमुख अॅड. श्रीनिवास वायकर यांचे त्याला सातत्याने सहकार्य मिळाले. प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक सुधीर शिंदे यांचा अवधूत हा मुलगा आहे. आईवडीलांनीही त्याला या स्पधेर्साठी प्रोत्साहन दिले. अवधूत याला कोल्हापूरचे पंकज रावाळू यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.