बॉम्बे सॅपर्सच्या १९८व्या वर्धापनदिनानिमित्त जवानांचे शानदार संचलन; शहिदांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 03:23 PM2018-01-31T15:23:05+5:302018-01-31T15:24:46+5:30
सकाळच्या कडाक्याच्या थंडीत...उगवत्या सुर्याला साक्षी ठेवत देशापुढील आव्हाने पेलण्यासाठी आणि भारतीय सीमांचे रक्षण करण्याची भावना उरी बाळगून बॉम्बे सॅपर्सच्या जवानांनी बीईजीच्या परेड ग्राऊंडवर शानदार संचलन केले.
पुणे : सकाळच्या कडाक्याच्या थंडीत...उगवत्या सुर्याला साक्षी ठेवत देशापुढील आव्हाने पेलण्यासाठी आणि भारतीय सीमांचे रक्षण करण्याची भावना उरी बाळगून बॉम्बे सॅपर्सच्या जवानांनी बीईजीच्या परेड ग्राऊंडवर शानदार संचलन केले. यावेळी युद्धात शहिद झालेल्या जवानांना मान्यवरांनी मानवंदना वाहिली.
बॉम्बे सॅपर्सचा १९८व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सकाळी झालेल्या शानदार संचलनाने या सोहळ्याची सांगता झाली. लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबू या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सीमईच कमांडंट लेफ्टनंट जनरल मायकल म्यॅथ्यूज, लेफ्टनंट जनरल मनोज पांडे, बीईजीचे कमांडंट ब्रिगेडिअर धीरज मोहन यावेळी उपस्थित होते. परेड कमांडट म्हणून कर्नल अजित सागरे आणि अभिजीत पवार यांनी संचलन सोहळ्याचे नेतृत्व केले.
सुरूवातीला देवराज अंबु यांनी संचलन सोहळ्याची पाहणी केली. यानंतर परेड सुरू करण्यात त्यांनी परवानगी दिली. लष्कराच्या बॅडपथकाच्या वाद्यावर शिस्तबद्ध वातावरणात बीईजीच्या ६ तुकड्यांनी संचलनाला सुरूवात केली. या परेड सोहळ्यात मराठा लाईट इन्फन्ट्री, शिख रेजीमेंट तसेच बीईजीमध्ये दाखल झालेल्या जवानांनी सहभाग घेतला.
यावेळी देवराज अंबू म्हणाले, बीईजीच्या जवानांनी आपल्या प्राणाची आहूती देऊन देशसेवा केली आहे. बीईजीला मोठा इतिहास आहे. युद्धामध्ये लष्कराला वेगाने पुढे जाण्यासाठी मोठी भूमिका बीईजीचे जवान बजावत असतात. या सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व जवानांना तसेच त्यांच्या परिवाराला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.