सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; शुल्क कपातीचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 04:00 PM2021-08-19T16:00:48+5:302021-08-19T16:05:08+5:30
ग्रंथालय, प्रयोगशाळा डिपॉजिट, कॉलेज मॅक्झीन,इंडस्ट्रीयल व्हिजिट शुल्क केले कमी
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शासन निर्देशानुसार संलग्न महाविद्यालयांच्या शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील सुमारे 650 महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून कोणते व किती शुल्क आकारावे व कोणते आकारू नये, याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
कोरोनामुळे पुण्यासह राज्यभरातील महाविद्यालये सुमारे दीड वर्षांपासून पूर्णपणे बंद आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेणे शक्य होत नाही. त्यामुळे केवळ आॅनलाईन पध्दतीने शिक्षण दिले जात आहे. महाविद्यालयांकडून दिल्या जाणा-या विविध सुविधांचा लाभ विद्यार्थी घेत नसल्याने महाविद्यालयीन शुल्कात कपात करावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात होती. राज्य शासनाने शासकीय महाविद्यालयांच्या शुल्कात कताप करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी झाली. परंतु, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या शुल्काबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता.
शासन आदेशानुसार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.सुधाकर जाधवर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.डॉ.व्ही.बी.गायकवाड व डॉ.संजय चाकणे हे या समितीचे सदस्य होते.या समितीने दिलेल्या अहवालानंतर विद्यापीठाने शुल्क कपातीचा निर्णय जाहीर केला.
------------------------------
विद्यापीठाने कोणत्या शुल्कात केली कपात
शुल्काचा प्रकार कमी केलेल्या शुल्काची टक्के
लायब्ररी ५०
लॉयब्रोटोरी ५०
जिमखाना ५०
स्टुडेंट वेलफेअर ७५
परीक्षा २५
इंडस्ट्रीयल व्हिजिट १००
कॉलेज मॅक्झीन १००
डेव्हलपमेंट फंड २५
लॉयब्रोटोरी डिपॉजिट १००
इतर डिपॉजिट १००
हेल्थ चेकप १००
डिझास्टर मॅनेजमेंट १००
अश्वमेध १००
कॉम्प्युटर सुविधा ५०
----------------------------
शासनाने विद्यापीठांना शुल्क कपातीचे आदेश दिले होते. मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाच्या धरतीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शुक्लात कपात केली आहे. ट्युशन शुल्कात कोणतीही कपात केलेली नाही.तसेच आॅक्टोबरपासून महाविद्यालये नियमितपणे आॅफलाईन पध्दतीने सुरू झाले तर विद्यार्थ्यांकडून पूर्वी प्रमाणे उरर्वरित महिन्यांसाठीचे शुल्क नियमानुसार आकारता येणार आहेत.
- सुधाकार जाधवर, सदस्य,व्यस्थापन परिषद ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
-----------------------------------
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या
पुणे : ३८८
अहमदनगर : १३१
नाशिक : १५८