Pune Rain: लाईट आली...! नागरिकांना मोठा दिलासा; पुण्याच्या पुरग्रस्त भागातील वीजपुरवठा सुरळीत

By नितीन चौधरी | Published: July 26, 2024 07:26 PM2024-07-26T19:26:43+5:302024-07-26T19:27:18+5:30

महावितरणने सुमारे १ लाख १७ हजार ३६५ (९७.७ टक्के) ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत करून मोठा दिलासा दिला

Great relief to citizens Electricity supply start flood affected areas of Pune | Pune Rain: लाईट आली...! नागरिकांना मोठा दिलासा; पुण्याच्या पुरग्रस्त भागातील वीजपुरवठा सुरळीत

Pune Rain: लाईट आली...! नागरिकांना मोठा दिलासा; पुण्याच्या पुरग्रस्त भागातील वीजपुरवठा सुरळीत

पुणे: महावितरणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांनी अतिवृष्टीमधील तब्बल १ हजार ३२७ पैकी १ हजार २९६ रोहित्रांचा वीजपुरवठा सुरू करून सुमारे १ लाख १७ हजार ३६५ (९७.७ टक्के) ग्राहकांना मोठा दिलासा दिला. तर शुक्रवारी (दि. २६) सायंकाळी उशिरापर्यंत सिंहगड रस्त्यावरील एकतानगर, मावळ, लोणावळा व इतर भागातील सुमारे ३१ रोहित्रांवरील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु होते.

पुणे व पिंपरी चिंचवड शहर व मुळशी, मावळ, खेड तालुक्यांत अतिवृष्टीचा व धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे नदीकाठच्या परिसरातील वीजयंत्रणेला मोठा फटका बसला. यासोबतच झाडे व झाडाच्या फांद्या, दरड कोसळल्याने तसेच वीजयंत्रणा पाण्यात गेल्याने गुरुवारी (दि. २५) उच्चदाबाच्या २६ वीजवाहिन्या व १ हजार ३२७ वितरण रोहित्रांवरील १ लाख १९ हजार ८६५ वीजग्राहकांचा वीजपुरवठा बंद झाला होता. यातील ९० टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा हा सुरक्षिततेचा उपाय म्हणून बंद ठेवावा लागला होता. या सर्व भागात गुरुवारी दुपारी उशिरा पावसाने उघडीप दिल्यानंतर सोसायट्यांमधील वीजसुरक्षेची खात्री करीत महावितरणकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्यास प्रारंभ करण्यात आला.

सिंहगड रस्त्यावरील एकता नगरीमध्ये गुरुवारी (दि. २५) महावितरणचे १९ रोहित्र पुराच्या पाण्यात गेल्याने सुमारे ६५ सोसायट्यांमधील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर अभियंते व कर्मचारी यांनी सोसायट्यांच्या सहकार्याने पाण्याचा निचरा झाल्यानंतर शुक्रवारी सकाळपर्यंत वीजसुरक्षेची खात्री करून १४ रोहित्रांचा वीजपुरवठा सुरु केला. उर्वरित ५ पैकी पाण्यात बुडालेले ३ रोहित्र नादुरुस्त झाल्याने ते केवळ एका तासात जेसीबीच्या सहाय्याने बदलण्यात आले. तसेच दोन रोहित्र सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. अद्याप २५ सोसायट्यांमधील मीटररूममध्ये पाणी आहे. त्यामुळे सुमारे २४०० ग्राहकांकडील वीज सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

मावळ तालुक्यातील भोरगिरी, कार्ला परिसरातील दऱ्याडोंगरात असलेल्या २३ रोहित्रांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम अद्यापही सुरू आहे. तसेच रावेत तसेच कोंढवे धावडे आदी ठिकाणी सुमारे ३५० वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत काम सुरु होते. यात शुकवारी (दि. २६) पहाटे १ वाजेपर्यंत तब्बल १ हजार ३२७ पैकी १ हजार १८२ रोहित्रांवरील १ लाख ७ हजार ७०० वीजग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी दिवसभरात आणखी ९ हजार ६६५ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

Web Title: Great relief to citizens Electricity supply start flood affected areas of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.