पुणेकरांच्या स्वयंशिस्तीचं सर्वोत्तम दर्शन; 'विकेंड' लॉकडाऊनला पुण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 01:49 PM2021-04-10T13:49:25+5:302021-04-10T14:16:26+5:30
रस्त्यांवर शुकशुकाट, दुकाने स्वयंफुर्तीने बंद
पुणे: राज्यात शनिवार आणि रविवार दोन दिवस विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातही लॉकडाऊनला पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद असल्याचे चित्र दिसून आले आहे. शहर आणि उपनगरतील प्रमुख रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बाहेर पडलेल्या नागरिकांची विचारपूसही पोलीस करत आहेत.
पुणे महापालिकेच्या आदेशानुसार सुरुवातीला सोमवार ते शुक्रवार दिवसभर जमावबंदी आणि रात्री संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्येही बदल करून हे पाच दिवस फक्त अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानांना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. अशा परिस्थितही पुणेकर घराबाहेर पडत होते. पण आज विकेंड लॉकडाऊनला पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद असल्याचे चित्र दिसून आले आहे.
पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाटयाने वाढू लागले आहेत. नागरिकांना रुग्णालयात बेड मिळणेही कठीण झाले आहे. त्यातच कालपासून लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. सद्यस्थितीत दिवसाला ५ हजारांच्या घरात रुग्ण आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी विकेंड लॉकडाऊनला गांभीर्याने घेतले आहे.
स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन अशा वर्दळीच्या चौकात तुरळक वाहने दिसून आली आहेत. तर मध्यवर्ती भागातील टिळक, केळकर, लक्ष्मी, शिवाजी रस्त्यांबरोबरच, कर्वे, सिंहगड, जंगली महाराज रस्त्यांवर शुकशुकाट झाला आहे.