माळीणला तीव्र पाणीटंचाई
By admin | Published: June 3, 2016 12:39 AM2016-06-03T00:39:41+5:302016-06-03T00:39:41+5:30
माळीण गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तात्पुरत्या निवारा शेडमध्ये राहणारे लोक बुब्रा नदीत पुलाखाली केलेल्या डवऱ्यातून पिण्यासाठी पाणी काढत आहेत.
घोडेगाव : माळीण गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तात्पुरत्या निवारा शेडमध्ये राहणारे लोक बुब्रा नदीत पुलाखाली केलेल्या डवऱ्यातून पिण्यासाठी पाणी काढत आहेत.
माळीण गाव गाडले गेल्यानंतर वाचलेल्या ग्रामस्थांसाठी माळीण फाट्यावर तात्पुरती निवारा शेड बांधून देण्यात आली आहे. या शेडवर पाण्यासाठी पाणी योजना, बोअरदेखील करण्यात आली. मात्र, कोणत्याही स्रोताला पाणी राहिले नसल्याने सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माळीण ग्रामस्थांनी बुब्रा नदीत डवरा केला असून, यातून पिण्यासाठी पाणी नेत आहेत. या डवऱ्याला कमी पाणी येत असल्याने एक तासात दोन हंडे पाणी भरते. हे पाणीदेखील वाटीने भरण्याची वेळ माळीण ग्रामस्थांवर आली आहे. तसेच पुनर्वसन होत असलेल्या माळीणसाठी देखील लाखो रुपयांची पाणी योजनेचे काम सध्या सुरू आहे. परंतु योजनेच्या विहिरीला व बोअरला पाणी लागले नसल्याने पाण्यासाठी वेगळ्या पर्यायांची शोधाशोध सुरू झाली आहे. बुब्रा नदीत मोठा बंधारा करून याद्वारे पाणीपुरवठा होऊ शकतो किंवा आसाणे गावाच्यावर पाईलडोहचे काम पूर्ण करून पाणी आणण्याचे नियोजन सुरू आहे. आंबेगाव तालुक्यात सध्या ३ टँकरद्वारे सहा गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. यातील दोन टँकर सरकारी व एक टँकर खासगी आहे. तर उर्वरित टंचाईग्रस्त गावांसाठी जिल्हाधिकारी यांनी
४ टँकर मंजूर केले आहेत.यामध्ये प्रामुख्याने आदिवासी भागातील गावांचा समावेश आहे. हे टॅँंकर पुरवठा करण्याचे काम सोनाई दूध वाहतूक संस्थेला असून, तसे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्याकडून टॅँकर मिळत नसल्याने टंचाईग्रस्त गावांचे सध्या हाल सुरू आहेत. डवऱ्याला कमी पाणी येत असल्याने एक तासात दोन हंडे पाणी भरते. हे पाणीदेखील वाटीने भरण्याची वेळ माळीण ग्रामस्थांवर आली आहे. कायमस्वरूपी पुनर्वसन होत असलेल्या माळीण गावासाठी देखील लाखो रुपयांची पाणी योजना करण्याचे काम सुरू आहे.
> घोडेगाव शहरात टंचाई
घोडेगाव : घोडेगाव शहराला अनेक वर्षांनंतर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. घोड नदीपात्र कोरडे पडल्याने विहिरीला पाणी कमी पडले असून, पाणीपुरवठ्याच्या टाक्या पूर्ण भरत नाहीत. त्यामुळे सध्या दिवसाआड पाणी येत असून, लवकर पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे.
‘पाण्याबाबत घोडेगाव सुखी’ असल्याचे सर्वजण म्हणतात; मात्र या वर्षी प्रथमच घोडेगावला पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. डिंभे धरणात शून्य टक्के पाणीसाठा झाल्याने धरणातून नदी, कालवे यांना पाणी बंद झाले आहे. त्यामुळे नदीला पाणी येण्याचा स्रोत बंद झाल्याने नदीपात्र कोरडे पडू लागले आहे. नदीतून विहिरीत येणारे पाणी कमी झाल्याने पाणीपुरवठ्याच्या टाक्या पूर्ण भरत नाहीत. त्यामुळे घोडेगाव शहराला सध्या दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे.
लवकर पाऊस न झाल्यास भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. हीच परिस्थिती घोडेगावजवळील धोंडमाळ, शिंदेवाडी, काळेवाडी, गोनवडी गावांची झाली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांचाही गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. घोडेगाव व परिसरात प्रत्येक शेतकरी कुटुंबाकडे जनावरे आहेत.