शरद मोहोळ कुटुंबीयांचे हिंदू समाजासाठी मोठे काम; आमदार नितेश राणेंचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 09:49 AM2024-01-09T09:49:07+5:302024-01-09T09:50:26+5:30
शरद मोहोळ यांच्या जाण्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये
पुणे : कोणतीही राजकीय किंवा अन्य चर्चा न करता मी मोहोळ कुटुंबीयांचे सांत्वन करायला आलो आहे. शरद मोहोळ यांच्या जाण्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. या प्रकरणाचा योग्य तो तपास पोलिस करीत आहेत. शरद मोहोळ यांची जी प्रतिमा दाखवली जाते ती चुकीची आहे, त्याबद्दल मोहोळ कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. मोहोळ कुटुंबीयांचे हिंदू समाजासाठी मोठे काम असल्याचे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.
राणे यांनी सोमवारी (दि. ८) सुतारदरा येथील मोहोळ यांच्या घरी जात त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलले. शरद मोहोळ गुन्हेगारी क्षेत्रात का आले? याची कुणाला माहिती नाही, त्यामुळे त्यांची अशी प्रतिमा मलिन केली जात आहे. ती तशी करू नये, अशी विनंती मी करतो, असेही राणे म्हणाले.
मोहोळ कुटुंब नेहमीच हिंदुत्व कार्यात अग्रेसर राहिले, तसेच शरद मोहाेळ होते. हिंदुत्वासाठी पुढे येणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या या दुःखद क्षणी येथे येणे माझी नैतिक जबाबदारी असून, हिंदुत्वाचे कार्य त्यांच्या पत्नीमार्फत सुरू राहीलच. त्यांना आमचेही सहकार्य असेल. - नितेश राणे, आमदार
आपला नवरा हिंदुत्ववादी होता, हिंदुत्वासाठी काम करीत होता म्हणून त्याची हत्या झाली. समोरच्याला असं वाटत असेल की अशा घटनेमुळे मी खचून जाईन, तर त्यांना मला एकच सांगायचं आहे, मी हिंदुत्ववाद्याची बायको आहे. माझा नवरा वाघ होता आणि मी वाघीण आहे. शेवटचा श्वास असेपर्यंत मी हिंदुत्वासाठी काम करणार आहे. सरकार आणि प्रशासनावर पूर्ण विश्वास असून, कायदा आपल्याला न्याय देईल. - स्वाती मोहोळ, शरद मोहोळची पत्नी