पुण्यात ‘सीएनजी’वरील दुचाकीला हिरवा झेंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 08:18 PM2017-11-24T20:18:30+5:302017-11-24T20:18:38+5:30
शहरात सध्या सीएनजी पंपाची संख्या तोकडी असल्याने वाहनांना लांबच लांब रांगा लावाव्या लागतात. त्यातच आता शहरात ‘सीएनजी’वरील दुचाकीलाही हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे.
पुणे : शहरात सध्या सीएनजी पंपाची संख्या तोकडी असल्याने वाहनांना लांबच लांब रांगा लावाव्या लागतात. त्यातच आता शहरात ‘सीएनजी’वरील दुचाकीलाही हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे. यापार्श्वभुमीवर शहर व लगतच्या पेट्रोल पंपांवरही सीएनजी पंप सुरू करण्याबाबत प्रस्ताव असून त्याबाबत प्रयत्न केला जाईल, असे केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच सीएनजी पंपांसाठी जागा उपलब्ध करण्याबाबत महाराष्ट्र शासन व पुणे महापालिकेशी चर्चा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल)ने शहरातील पाच हजार दुचाकींना सीएनजी कीट बसविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, ‘गेल’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बी. सी. त्रिपाठी, ‘एमएनजीएल’चे व्यवस्थापकीय संचालक ए. एम. तांबेकर, संचालक (व्यावसायिक) संतोष सोनटक्के, संचालक राजेश पांडे आदी उपस्थित होते. यावेळी सुर्यकांत दामले, महेश पारखी व उमा मस्कर या पहिल्या तीन ग्राहकांना प्रधान यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच कार्यक्रमानंतर त्यांनी सीएनजी कीट बसविलेल्या दुचाकी फेरीला हिरवा झेंडा दाखवून काही अंतरावपर्यंत दुचाकी चालवुन फेरीत सहभागही घेतला.
प्रधान म्हणाले, देशाला २०४० पर्यंत सध्याच्या गरजेचे तिप्पट इंधन लागणार आहे. पर्यावरणात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे संतुलन राहिलेले नाही. त्यामुळे सीएनजी, इथेनॉल यांसह अन्य बायो इंधनाचा उपयोग वाढवावा लागणार आहे. याचे नेतृत्व पुणे शहर करेल. पुणे तसेच परिसरात सध्या ५० सीएनजी पंप आहेत. गिरीष बापट यांनी प्रत्येक पेट्रोल पंपावर सीएनजी पंप सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्याचा विचार केला जाईल. आधी दिल्ली व मुंबईमध्ये दुचाकी पथदर्शी प्रकल्प म्हणून सीएनजी दुचाकीचा प्रकल्प राबविण्यात आला. पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पुण्यात सुमारे २३ लाखांहून अधिक दुचाकी असून इथे चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा प्रधान यांनी व्यक्त केली.
सीएनजी पंपासाठी शहरात इतर ठिकाणी जागेची अडचण आहे. पुणे विद्यापीठामध्ये दररोज हजारो वाहने ये-जा करतात. इथेही जागाही उपलब्ध असल्याने विद्यापीठातच एक सीएनजी पंप सुरू करायला हवा. विद्यापीठानेच तो सुरू करून त्याचा नफाही घ्यावा, असे बापट म्हणाले. तांबेकर यांनी प्रास्ताविक केले.
सीएनजी कीटसाठी बिनव्याजी कर्ज
दुचाकींना बसविण्यात येणाºया सीएनजी कीटची किंमत १५ हजार ५०० रुपये आहे. या कीटसाठी ग्राहकांना १२ हजार रुपयांचे कर्ज बँक आॅफ महाराष्ट्राकडून मिळणार नाही. या कर्जाचे संपुर्ण व्याज ‘एमएनजीएल’कडून दिले जाणार आहे. किट बसविल्यानंतर ग्राहकांना प्रति किलोमीटर केवळ ७० पैसे गॅसचा खर्च येईल, अशी माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.