अनारक्षित तिकीटांना हिरवा कंदील?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:29 AM2020-12-12T04:29:07+5:302020-12-12T04:29:07+5:30
पुणे : रेल्वे बोर्डाने अनारक्षित तिकीटावर प्रवास करण्यास प्रवाशांना मान्यता दिली आहे. आता प्रादेशिक स्तरावर या निर्णयाच्या अंमलबजावणीचा निर्णय ...
पुणे : रेल्वे बोर्डाने अनारक्षित तिकीटावर प्रवास करण्यास प्रवाशांना मान्यता दिली आहे. आता प्रादेशिक स्तरावर या निर्णयाच्या अंमलबजावणीचा निर्णय अवलंबून आहे. असे झाल्यास प्रवाशांना आरक्षणाशिवाय जनरल डब्यातून प्रवास करता येणार आहे. तसेच लोकल, पॅसेंजर गाड्यांमध्येही सर्वसामान्य प्रवाशांना प्रवेश दिला जाऊ शकतो.
अनलॉकमध्ये रेल्वेगाड्या सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून एक्सप्रेस गाड्यांसाठी आरक्षण बंधनकारक केले आहे. आरक्षित तिकीटाशिवाय प्रवाशांना प्रवास करता येत नाही. त्यामुळे अनेकदा आरक्षण न मिळाल्याने प्रवास पुढे ढकलावा लागतो. यातून प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकल गाड्यांमध्येही शासनाने निश्चित केलेल्या लोकांनाच प्रवास करता येतो.
या अनुषंगाने मध्य रेल्वेसह पश्चिम रेल्वे, पूर्व रेल्वे व दक्षिण-पूर्व रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे अनारक्षित तिकीट देण्यास मान्यता मागितली होती. त्यानुसार मंडळाने या तिकीट विक्रीला हिरवा कंदील दाखविला पण याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय झोनल रेल्वेला घ्यावा लागणार आहे.
याविषयी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्य शासनाकडून लोकल गाड्यांमध्ये अद्याप सर्वसामान्यांना प्रवास करण्यास परवानगी दिलेली नाही. तसेच एक्सप्रेस गाड्यांमध्येही केवळ आरक्षण सुरू आहे. अॅप किंवा अन्य माध्यमातून अनारक्षित तिकीट सुरू करण्यासाठी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर अंमलबजावणी सुरू होऊ शकते.
----------
“एक्सप्रेस गाड्यांमध्ये अनारक्षित तिकीटाला परवानगी गरजेची आहे. पण जनरल डब्यांमध्ये त्यामुळे गर्दी वाढेल. त्यावर नियंत्रण कोण ठेवणार, हा प्रश्न आहे. जनरल डबे वाढवले पाहिजेत.”
-हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी गु्रप
------------