बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 04:00 PM2019-06-01T16:00:54+5:302019-06-01T16:11:40+5:30
बारामतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे.
पुणे : बारामती येथील शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयास मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय)ने मान्यता दिल्याने प्रथम वर्ष ‘एमबीबीएस’ प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. यावर्षीपासून महाविद्यालयात प्रथम वर्षात १०० प्रवेश होतील. महाविद्यालयासाठी आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती, उपकरणे खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी हे महाविद्यालय संलग्न असेल.
बारामतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. महाविद्यालयाची अडीच लाख चौरस फुट क्षेत्रफळ असलेली सहा मजली प्रशस्त इमारत सज्ज झाली आहे. स्वतंत्र पाच मजली वसतिगृह, दोन मजली ग्रंथालय, ८०० आसन क्षमतेचे सभागृह उभारण्यात आले आहे. हरित इमारतीची संकल्पना यामध्ये वापरण्यात आली आहे. त्यामुळे हे महाविद्यालय बारामतीच्या वैभवात आणखी भर पाडणार आहे. मागील काही महिन्यांपासून महाविद्यालयामध्ये प्रवेश सुरू करण्यासाठी एमसीआयच्या मान्यतेची प्रतिक्षा होती. दोन महिन्यांपुर्वी कौन्सिलच्या प्रतिनिधींनी भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर दोन दिवसांपुर्वी कौन्सिलने महाविद्यालयाला मान्यता दिल्याचे राज्य शासनाला कळविले.
मान्यतेमुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयात प्रथम वर्ष एमबीबीएसचा १०० प्रवेश क्षमतेचा वर्ग सुरू होईल. सुरूवातीला अॅनॉटॉमी, फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्रिी हे विषय शिकविले जाणार आहेत. ‘नीट’ प्रक्रियेंतर्गत लवकरच महाविद्यालयाची नोंदणी होऊन प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. त्यानंतर आॅगस्ट महिन्यापासून अध्यापनाला सुरूवात होईल. महाविद्यालयाला बारामतीतील महिला रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय, रूई ही तीन रुग्णालये संलग्न केली जाणार आहेत. ही रुग्णालये लवकरच महाविद्यालयाच्या ताब्यात देण्यात येतील. प्राध्यापक, विभागप्रमुखांच्या नियुक्त्या यापुर्वीच झाल्या आहेत. परिचारिका, वर्ग ३ व ४ ची पदेही लवकरच भरली जातील. उपकरणे खरेदीची प्रक्रियाही सुरू असून अंतिम टप्प्यात आहे. नाशिके येथील विद्यापीठाची समितीही लवकरच महाविद्यालयाची पाहणी करून शिक्कामोर्तब करेल.
-----------------
कौन्सिलची मान्यता मिळाल्याने प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या आॅगस्ट महिन्यापासून महाविद्यालय सुरू होईल. मनुष्यबळ नियुक्ती तसेच उपकरणांच्या खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच तीन रुग्णालयेही लवकरच वैद्यकीय शिक्षण विभागागाच्या ताब्यात मिळतील.
- डॉ. संजयकुमार तांबे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती