खानवडीत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:10 AM2021-01-04T04:10:45+5:302021-01-04T04:10:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गराडे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून अभिवादन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गराडे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून अभिवादन करण्यात आले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शिक्षक दिन तसेच बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला. कोरोनाच्या नियमावलीचे पालन करत खानवडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुरंदर पंचायत समिती सभापती नलिनी लोळे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे, पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, बहुजन हक्क परिषद संस्थापक सुनील धिवार, उद्योजक हरिभाऊ लोळे, गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या स्वतंत्र सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत खानवडी तर्फे कोविडयोध्दा यांना प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देण्यात आले.
बालिका दिनानिमित्त महिला व बालकल्याण विभागातर्फे २ नवजात बालिकेचे मातेसह स्वागत करण्यात आले. याप्रसंगी कुंभारवळण शाळेच्या उपशिक्षिका शीतल खैरे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कास्ट्राइब शिक्षक संघटनेतर्फे येथील जिल्हा परिषद शाळेला पुस्तके भेट देण्यात आली. क्रांतिज्योती सावित्रीबाईंची हुबेहुब रांगोळी काढणारे मीरा कुंजीर, स्नेहल गद्रे, रोहिणी टिळेकर, सुवर्णा मेमाणे व श्यामकुमार मेमाणे यांचाही सन्मान करण्यात आला. प्रास्तविक मीरा कुंजीर यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब फडतरे यांनी केले. आभार श्यामकुमार मेमाणे यांनी मानले.
चौकट :
ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील मालिका टीआरपीसाठी बंद होते यासारखी दुसरी शोकांतिका नाही. समाजाने यावर विचार करण्याची गरज आहे. सावित्रीबाई फुले यांनी खडतर परिस्थितीत केलेल्या अतुलनीय कार्याचा आढावा घेऊन आज सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याची गरज असल्याचे असे मत गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी मांडले.
फोटोओळी : खानवाडी येथील महात्मा फुले स्मारकात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीप्रसंगी उपस्थित मान्यवर.