शिवनेरीवर शिवरायांना अभिवादन, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 04:32 AM2018-02-20T04:32:41+5:302018-02-20T04:32:54+5:30
छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर सोमवारी शिवजन्माचा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने थाटात साजरा करण्यात आला.
जुन्नर (जि. पुणे) : छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर सोमवारी शिवजन्माचा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने थाटात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवूण शिवजन्मसोहळा साजरा केला. शिवकुंज स्मारकातील बालशिवबा व राजमाता जिजाऊ यांच्या शिल्पास त्यांनी अभिवादन केले. शिवकुंज स्मारकपर्यंत बालशिवबाची पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
पोलीस दलाच्या वतीनेही मानवंदना देण्यात आली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, पर्यटनमंत्री जयप्रकाश रावळ, आमदार आशिष शेलार, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे,आमदार शरद सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.
मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित अभिवादन सभेत बोलताना तावडे यांनी राज्यातील १४ किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी शासनाने १२८ कोटी रुपयांची विकासकामे केल्याचे सांगितले.
पंकजा मुंडे, तावडेंना रोखले
मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव शिवनेरीवर येणा-या शिवभक्तांना सक्तीने आगाऊ प्रवेशाचे पास काढण्यास सांगण्यात येत होते. त्यामुळे शिवप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत होती. केवळ दीड हजार पास देण्यात आल्याने हजारो शिवप्रेमी किल्ल्याच्या पायथ्याशी खोळंबले होते. त्यामुळे पंकजा मुंडे व विनोद तावडेंना शिवप्रेमींनी काही काळ रोखून ठेवले. व्हीआयपी संस्कृती बंद करा, भाजप सरकार हाय हाय... अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. मुंबई येथे कार्यक्रम असल्याने कोणतेही भाषण न करता मुख्यमंत्री लगबगीने निघून गेल्यानेही शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली.
च्जुन्नरला पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्याचा शासन निर्णय झाला असून, दोन दिवसांत याबाबत अध्यादेश काढण्यात येणार असल्याची घोषणा सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
तुळजापुरात भवानी तलवार
अलंकार महापूजा
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मंदिरात सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना देवीने दिलेल्या भवानी तलवारची विशेष अलंकार पूजा मांडण्यात आली होती. पूजेनंतर देवीला धुपारती व नैवेद्य दाखविण्यात आला. यानंतर चांदीच्या मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसिलदार राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी भोपे मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम परमेश्वर, मंदिर संस्थानचे सहाय्यक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, आदी उपस्थित होते.