‘स्वरभास्करा’स मैफलीद्वारे अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:18 AM2021-02-06T04:18:57+5:302021-02-06T04:18:57+5:30
पुणे : ‘स्वरभास्कर’ पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पं. यादवराज फड यांनी स्वराभिषेकातून पंडितजींना अभिवादन केले. ताल स्वरानंद ...
पुणे : ‘स्वरभास्कर’ पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पं. यादवराज फड यांनी स्वराभिषेकातून पंडितजींना अभिवादन केले.
ताल स्वरानंद संस्थेच्या वतीने ‘चतुरस्र अभिवादन’ मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानेश्वर तापकीर, संजय बालवडकर, अभय माटे, प्रकाश गुरव, चंद्रशेखर अडावदकर आणि पं. यादवराज फड यांनी प्रारंभी पंडित भीमसेन जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
पं. फड यांनी कार्यक्रमाची सुरुवात राग पूरिया कल्याण रागातील ‘सुभान बनरी माला’ या ख्यालने केली. मिश्र काफी रागातील ’पिया तो मानत नाही’ ही ठुमरी त्यांनी ढंगदारपणे सादर केली. पंडितजींनी अजरामर केलेल्या ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ हा अभंग आणि ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली’ ही गौळण त्यांनी सादर केली. कार्यक्रमाची सांगता ‘जो भजे हरि को सदा’ या भैरवीतील गाजलेल्या ब्रह्मानंदाच्या रचनेने केली. विशाल मोर (तबला), संजय गोगटे (हार्मोनियम), अशोक मोर (मृदंग) आनंद टाकळकर (टाळ), तर सुनील पासलकर आणि अमोल मोरे (स्वर साथ) यांनी साथसंगत केली. या वेळी चंद्रकांत महाराज वांजळे, भीमराव दौंड, कल्याणराव माने आदी उपस्थित होते. भरत पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.