मार्केटयार्ड येथील भुसार व गूळ बाजार देखील बंद होणार; भाजीपाला, फळे, फुले विभागाचा बंद कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 07:05 PM2020-05-04T19:05:46+5:302020-05-04T19:09:56+5:30
कामगारांच्या जीवाची हमी कोणी घेईना म्हणून निर्णय
पुणे : पुण्यात प्रामुख्याने मार्केटयार्डमधील प्रेमनगर आणि आंबेडकरनगर येथे पाच पेक्षा अधिक कोरोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. येथे अनेक लोकांच्या तपासण्या देखील झालेल्या नसून, कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. यामुळे या भागातील हमाल व कामगारांनी बुधवार (दि.6) पासून कामावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मार्कटयार्डातील भूसार व गूळ बाजार बंद करण्याची मागणी केली आहे. यामुळे शहर आणि जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरुळीत होत असताना पुण्यातील भुसार व गूळ बाजार बंद होण्याच्या मार्गावर आहे. तर येथील भाजीपाला, फळे व फुले विभाग बंदच राहणार असल्याचे आडते असोसिएशन स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांत पुणे शहरात प्रामुख्याने झोपडपट्टी आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत आहे. यामुळे आजही एकट्या पुणे शहरात दररोज शंभार पेक्षा अधिक नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडत आहे. परंतु राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहरातील कन्टमेन्ट झोन शिवाय व ग्रामीण भागात अतिबाधित क्षेत्र वगळून बहुतेक सर्व निर्बंध शिथील केले आहेत. यामुळे सोमवारी शहरामध्ये सर्वत्रच मोठी गर्दी पाहिला मिळाली. सध्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी पडू नये म्हणून कोरोनाचा अति प्रादुर्भाव असताना देखील गुलडेकडी येथील मार्केट याडार्तील भूसार व गूळ बाजार सुरू होता. सध्या दरोरोज किमान सरासरी 150 ट्रक मालाची आवक होत आहे. परंतु या भूसार बाजारात दररोज काम करण्यासाठी येणा-या कामगारांच्या वस्तीतच सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. हा सर्व परिसर प्रशासनाने कन्टमेन्ट झोन म्हणून घोषित केला आहे. यामुळेच येथील कामगारांनी हा धोका अधिक वाढू नये यासाठी बुधवार (दि.6) पासून कामावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम भूसार व गूळ बाजार होणार असून, सध्या सुरुळीत असलेला बाजार बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
-------
कामगारांच्या जीवाची हमी कोणी घेईना म्हणून निर्णय
पुणे मार्केटयार्ड येथील प्रेमनगर 5,आंबेडकरनगर येथे 8 कोरोना पॉजिटिव्ह आढळलेत. यात दोन व्यक्ती मयत ही झालं आहेत. आजही अनेक लोकांची टेस्ट झालेल्या नाही. दाट लोकवस्ती असल्यामुळे कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून परिस्थिती हाताबाहेर जाईल. याच ठिकाणी भुसार बाजार सुरू आहे, बरेच कामगार आज ह्या झोपडपट्टीतून त्याठिकाणी कामाला येत आहेत. त्यामुळे भुसार बाजार बंद करावा. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव तीव्र गतीने वाढेल याकरिता पत्र देण्यात आले आहे. तसेच आमच्या कामगारांच्या जीवाची हमी देखील संबंधित यंत्रणा कोणीही घेत नाही. त्यामुळे सोमवारी झालेल्या सर्व संघटना च्या बैठकीत ठरल्यानुसार बुधवारपासून भुसार बाजारातील आमचा कोणताही कामगार कामावर येणार नाही.
- नवनाथ बिनवडे , सरचिटणीस, हमाल पंचायत व संतोष नांगरे, सरचिटणीस, कामगार युनियन
--------
दि पूना मर्चंट चेंबरची मंगळवारी बैठक
गेल्या दीड महिन्यांपासून भूसार व गूळ बाजार नियमित सुरू आहे. सोमवार (दि.4) रोजी देखील 156 ट्रक मालाची आवक झाली. परंतु सर्व कामगार व हमाल संघटना कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर बुधवार पासून कामावर न येण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बुधवार पासून बाजार सुरू ठेवायचा किंवा काय यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मंगळवार (दि.5) रोजी सकाळी दि पूना मर्चंट चेंबरची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात येईल.
- पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष दि.पूना मर्चट चेंबर
----------
भाजीपाला, फळे बंद विभागाचा बंद कायम
गुलटेकडी येथील मार्केट याडार्तील परिसरा लगत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मार्केट यार्डात काम करणारे कामगार सर्व प्रभावित क्षेत्रातून येतात. यामुळे पुढील धोका लक्षात घेऊन भाजीपाल व फळे विभागाचा बंद कायम ठेवण्याचा निर्णय आडते असोसिएशन घेतला आहे.
- विलास भुजबळ , अध्यक्ष आडते असोसिएशन