काजव्यांचा लखलखाट तारे जमीं पर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 08:30 PM2018-06-26T20:30:16+5:302018-06-26T20:31:51+5:30
काजवे लुकलुक करून झाडांवर बसलेल्या माद्यांना संदेश पाठवतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी दिसणारे हे दृश्य अतिशय अविस्मरणीय असते.
भीमाशंकर : सहयाद्रीच्या डोंगरदऱ्यांमधील झाडे सध्या चमचम करीत आहेत. ती चमचम कृत्रिम लाईटची नसून ‘काजव्यांच्या’ प्रकाशाने झगमगणाऱ्या झाडांची आहे. आकाशातील तारांगण जणू जमिनीवर भेटायला आल्याची अनुभूती हे काजवे चमकताना पाहून वाटते. पक्षी वसंत ऋतूत गाऊन माद्यांना आकर्षित करतात, तसे काजवे लुकलुक करून झाडांवर बसलेल्या माद्यांना संदेश पाठवतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी दिसणारे हे दृश्य अतिशय अविस्मरणीय असते. इमारतींवर सोडलेल्या लाईटच्या माळा जशा चमकतात, तसे हे हजारो काजवे लुकलुक करत फिरतात. आकाशातील ‘तारांगण’ जसे दिसते तसे हुबेहूब दृश्य दिसत असते. जणू तारांगणच जमिनीवर भेटायला आल्यासारखे वाटते. सध्या हे सुंदर दृश्य पश्चिम घाटात पाहावयास मिळत आहे. भंडारदरापासून हरिश्चंद्रगड, माळशेज, नानेघाट, आहुपे, भीमाशंकर, लोणावळा, महाबळेश्वर, माथेरानपासून पश्चिम घाटातील डोंगरदऱ्यांमध्ये हे काजवे चमकताना दिसत आहेत. थोडा जास्त पाऊस सुरू झाल्यावर काजव्यांची ही चमचम थांबून जाते.
अशा प्रकारे काजवे चमकणे म्हणजे चांगल्या निसर्गाचे निर्दशक आहेत. जर देशी झाडांऐवजी विदेशी झाडांची लागवड वाढली, देशी झाडे तुटली, जंगलांमध्ये वाढता माणसांचा वावर , वाहतूक, नागरीकरण यामुळे भविष्यात हे दृश्य कितपत दिसेल याबद्दल साशंकता आहे . ज्या ठिकाणी माणसाचे आक्रमण कमी आहे, अशा ठिकाणी लक्षावधींच्या संख्येने हे काजवे दिसतात. इंग्रजीमध्ये या क्रियेला ‘ग्लोवॉर्म’ म्हणजेच प्रकाशमयआयु असे म्हणतात. हे दृश्य म्हणजे न बोलता प्रकाशाची भाषा आहे.
.................
‘या कुंजातून त्या कुंजातून, इवल्याशा या दिवट्या लावून, मध्यरात्रीच्या निवांत समयी, खेळ खेळत वनदेवी ही’ बालकवींची फुलराणी कवितेत अशा प्रकारे काजव्यांचा खूप छान उल्लेख केला आहे. अनेक हिंदी-मराठी कवींनी काजव्यांवर गाणी लिहिली आहेत. जुगनू नावाचा सिनेमादेखील झाला आहे.