Ground Report | नवले ब्रीज अपघातातून बोध न घेतल्यास मोठ्या जीवितहानीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 03:51 PM2022-11-21T15:51:29+5:302022-11-21T16:05:34+5:30
अपघातमागील कारणांची चिकित्सा आणि आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे...
- पांडुरंग मरगजे
धनकवडी (पुणे) : ट्रक ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने ४८ वाहनांना अपघात, ही घटना 'काळ आला पण वेळ आली नव्हती', असे म्हणून कानाडोळा करण्याची नाही. कारण याच उतारावर विविध अपघातांमध्ये आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे दैवावरती हवाला न ठेवता या अपघातमागील कारणांची चिकित्सा करणे आणि आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी रस्ते वाहतूक आणि पोलीस प्रशासनाकडून होणे, गरजेचे असल्याचे लोकमत पाहणी स्थळ अहवालामध्ये समोर आले आहे.
रविवारी नवले ब्रीज अपघाताचे जे प्रमुख कारण समोर आले आहे ते म्हणजे ट्रक चालकाचे ट्रकवरील सुटलेले नियंत्रण होय. सातारा रोड नवीन एक्स्प्रेस हायवेवर शिंदे वाडीकडून बोगद्यामार्गे पुण्याकडे येताना ३.५ ते ४ % ग्रॅडियंट उतार आहे. शास्त्रीय दृष्ट्या ५ % ग्रॅडियंट उतार योग्य असला तरी माणसशास्त्रीयदृष्या या उताराचा विचार होणे गरजेचे आहे. बोगद्यातून ( ३ ते ५ किमी) प्रवास केल्यानंतर मोकळ्या रस्त्यावर आल्यानंतर थोडंसं हायसं वाटतं आणि आता शहर जवळ आल्याच्या भावनेतून वाहनांची गती वाढवण्याकडे कल होतो.
'स्ट्रक्चरल ऑडिट' गरजेचे-
अशावेळी या मार्गावर गतिदर्शक फलक असावेत आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून गती अधिक आढळल्यास तत्काळ कारवाई केली गेली पाहिजे. तसेच स्पीड ब्रेकर बसवणे, त्यांची संख्या वाढवणे, हे तात्पुरते उपाय योजने जसे गरजेचे आहे त्याच प्रमाणे या मार्गाचे 'स्ट्रक्चरल ऑडिट' करून यातील दोष कायमस्वरूपी काढून टाकणे गरजेचे आहे. तसेच या ठिकाणी पोलीस चेक पोस्ट असणे गरजे चे असून ड्रायव्हर वाहन बंद अर्थात न्युट्रलवर चालवत असल्यास त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
चालकांना सामारे जावे लागते 'या' अडचणींना-
लांबच्या पल्ल्याच्या ट्रक ड्रायव्हरसाठी ट्रक चावलणे हे प्राण पणाला लावून चालवण्याचे काम असते. लांबचा पल्ला, कनसाईनमेंट अर्थात मालाची खेप वेळेत पूर्ण करणे व त्यासाठी मालकाचा तगादा असणे, जेवणाच्या व झोपेच्या अनियमित वेळा, आरोग्याची हेळसांड, बदली माणूस नसणे, घरापासून मैलोनमैल दूर असणे, रात्रंदिवस करावे लागणारे ड्रायव्हिंग, पोलीस प्रशासनाचा अनंत कारणे दाखवून कारवाईचा बडगा आणि भावनाशून्य वर्तन अशा अनंत अडचणींना या ड्रायव्हर मंडळींना तोंड द्यावे लागते.
ओव्हरटाईम कामाचा परिणाम-
नोकरदार आठ तास नोकरी करतो व घरी जातो. तर ड्रायव्हर मंडळी दिवसाचे १८ ते २४ तास ट्रकवर कार्यरत असतात. त्यामुळे या लोकांना मोठ्या ताणतणावाला तोंड द्यावे लागते. म्हणूनच ड्रायव्हर मंडळींसाठी कामाचे तास, आरोग्य, जेवणाच्या वेळा, विश्रांतीच्या वेळा यांची नियमावली असणे व तीची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
खासदारांच्या सूचना-
नवले ब्रीज अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अपघात स्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच बोगद्यातून येतानाचा तीव्र उतार कमी करण्यासाठी तंज्ञांचा सल्ला घेऊन तसेच सेवा रस्ते आणि सेवा रस्त्यांना (आऊटलेट) येऊन मिळणारे इतर मार्ग शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केले पाहिजेत अशी सूचना केली.
गाडी चालवताना संयम महत्त्वाचा-
लोकप्रतिनिधींनी अशी दखल घेतल्यास व्यवस्था हलू शकते, हे उत्तम आहे. पण त्याच बरोबर खुद्द ड्रायव्हर मंडळींनी आपले वाहन संयमाने चालवणे गरजेचे आहे. राजस्थानमधील महिलेचा याच विषयावर प्रबोधन करणारा व्हिडिओ सद्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून त्या माध्यमातून समाजामध्ये जागृती घडत आहे. हे उत्तम असले तरी सर्वच घटकांनी आपापली जबाबदारी योग्यरित्या पार पाडल्यास रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल. रस्ते प्रवास अटळ आहे म्हणूनच रस्ते प्रवासाशी निगडित प्रत्येक घटकाने काळजी घेणे अनिवार्य आहे, अन्यथा परिणाम अटळ आहे.