मल्ल घडविणारी लिंबाची तालीम
By admin | Published: December 11, 2015 12:45 AM2015-12-11T00:45:55+5:302015-12-11T00:45:55+5:30
नढे-तापकीर, हरिजन वस्ती व लिंबाजी तालीम या तीन तालमी पूर्वी रहाटणी गावात होत्या. त्यापैकी दोन तालमी बंद झाल्या. लिंबाची तालीम ही एकच तालीम सुरू आहे
नढे-तापकीर, हरिजन वस्ती व लिंबाजी तालीम या तीन तालमी पूर्वी रहाटणी गावात होत्या. त्यापैकी दोन तालमी बंद झाल्या. लिंबाची तालीम ही एकच तालीम सुरू आहे. रहाटणी गावच्या स्थापनेपासून असलेली ही जुनी तालीम आहे. १० वर्षांपूर्वी महापालिकेने या तालमीसाठी इमारत बांधून दिली आहे. या तालमीत वस्ताद बाजीराव नेवाळे यांनी अनेक मल्ल घडविले.
पंचक्रोशीत या तालमीची ख्याती आहे. एकनाथ नखाते, भगवान नखाते, मोरू नखाते, सीताराम नढे, धोंडिबा कोकणे, शिवराम कदम, तुळशीराम नखाते असे अनेक मल्ल या तालमीत तयार झाले. अनेक स्थानिक मैदानी कुस्त्यांमध्ये त्यांनी नावलौकिक मिळविला. यानंतरच्या पिढीत विलास नखाते, विजय नखाते, श्रीराम कोकणे हे मल्ल घडले. श्रीराम कोकणे हे १९५६ ते १९६० या कालावधीत सतत चार वर्षे आॅल इंडिया विद्यापीठ चॅम्पियन होते. त्यांनी चार वर्षे विद्यापीठाचे नेतृत्व केले. तेव्हा त्यांनी चारही वर्षे सलग विद्यापीठाला चॅम्पियनशिप मिळवून दिली. या तालमीत सराव करणाऱ्या किशोर नखाते, संतोष नखाते, उमेश तांबे, निखिल नखाते, नीलेश नखाते या मल्लांनी विविध कुस्ती सामन्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोकणे हे पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष होते.
१९८७ ते २०१३ या त्यांच्या अध्यक्षतेच्या कालावधीत त्यांनी शहरात कुस्तीचा प्रचार व प्रसार केला. या दरम्यान त्यांनी शहरातील अनेक मल्ल राज्यस्तरीय कुस्त्यांमध्ये चमकविले. या संघामार्फत २००४-०५मध्ये नितीन बारणे यांची जर्मनी येथे होणाऱ्या कुस्ती स्पर्धेत निवड झाली होती. त्याबद्दल बारणे यांना महापालिकेने १५ हजार रोख देऊन सन्मानित केले होते. ‘सध्याच्या काळातील तरुणांनी तालमीकडे पाठ फिरविली आहे. अनेक तरुण तर व्यायामही करीत नाहीत. व्यायाम करणाऱ्यांमध्ये जीममध्ये जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जीमच्या व्यायामाने शरीरयष्टी पीळदार बनविता येते. परंतु, जीम बंद केल्यानंतर शरीरयष्टी पूर्वस्थितीत येते. तालमीत व्यायाम करून कमावलेली तब्येत मात्र कधीच कमी होत नाही. तालमीकडे तरुणांनी पाठ फिरविल्याने कुस्त्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे,’ असे तालमीचे मार्गदर्शक श्रीराम कोकणे यांनी सांगितले. सध्या ते या तालमीची संपूर्ण देखभाल व व्यवस्था पाहतात.