भुयारी मार्गांना मिळणार ‘झळाळी’
By admin | Published: November 7, 2016 01:44 AM2016-11-07T01:44:29+5:302016-11-07T01:44:29+5:30
काळाकुट्ट अंधार, कुबट वास, घाणीचे साम्राज्य आणि टवाळखोरांचा अड्डा असे स्वरूप आलेल्या पुणे शहरातील विविध भुयारी मार्गांना झळाळी मिळावी
पुणे : काळाकुट्ट अंधार, कुबट वास, घाणीचे साम्राज्य आणि टवाळखोरांचा अड्डा असे स्वरूप आलेल्या पुणे शहरातील विविध भुयारी मार्गांना झळाळी मिळावी, या उद्देशाने शहरातील एका आर्किटेक्चर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पालिका प्रशासनाला उपयुक्त अहवाल सादर केला आहे. प्राप्त अहवालानुसार भुयारी मार्गात आवश्यक बदल करण्यास पालिका प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत असल्याने बंद पडलेले भुयारी मार्ग पुन्हा गर्दीने गजबजतील, अशी आशा निर्माण झाली आहे.
पादचारी नागरिकांच्या सोईसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले पुणे शहरातील विविध भुयारी मार्ग सध्या निर्जन अवस्थेत आहेत. काही भुयारी मार्ग तर भटकी कुत्री, पत्ते खेळणारे जुगारी आणि व्यसनी लोकांचे राहण्याचे ठिकाण बनले आहे. परंतु, या मार्गातून शहरातील महिला व मुलींनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी निर्भीडपणे ये- जा करावी, या हेतूने ब्रिक स्कूल आॅफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी शहरातील सात भुयारी मार्गांची पहाणी केली. त्यात ससूनसह डहाणूकर कॉलनी, वनाज, वारजे, शनिवारवाडा, कर्वेनगर आदी परिसरातील भुयारी मार्गांचा समावेश होता.
ब्रिक स्कूल आॅफ आर्किटेक्चरतर्फे महाविद्यालयस्तरावर विविध विषयावर स्पर्धा घेण्यात आली. त्यात भुयारी मार्ग मुलींसाठी सुरक्षित कसे होतील, या विषयावरील प्रकल्प या महाविद्यालयाचा विद्यार्थी ईशान केसकर व त्याच्या सहकारी विद्यार्थ्यांनी भुयारी मार्गांची पाहणी करून सादर केला. या स्पर्धेत केसकर यांचा संघ विजयी झाला. या प्रकल्पाचा उपयोग पालिका प्रशासनाला व शहरातील नागरिकांना व्हावा, या हेतूने पालिकेच्या पथविभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांना अभ्यासपूर्ण अहवाल महाविद्यालयातर्फे देण्यात आला. कमी खर्चात भुयारी मार्गांचा वापर कसा करता येईल, याबाबत उपयुक्त माहिती दिल्याने पालिका प्रशासनाने अहवालानुसार बदल करण्याचे आश्वासन दिले.
विद्यार्थी ईशान केसकर म्हणाला, ‘‘पालिकेने आमच्या १५ मुलांच्या गटाला ससूनजवळील व वारजे येथील पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यास सांगितले. सात दिवस आम्ही भुयारी मार्गाजवळून जाणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. (प्रतिनिधी)