तरुणांनी तयार केला रक्तदात्यांची साखळी बांधणारा ‘ग्रुप’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 10:34 AM2019-06-16T10:34:58+5:302019-06-16T10:35:56+5:30
तातडीने रक्तपुरवठा करण्यासाठी ‘ब्लड डोनर्स नेटवर्क इंडिया’ची स्थापना
- दीपक कुलकर्णी
पुणे : ज्याची गरज कोणत्याही क्षणी आणि कुणालाही पडू शकते, ते म्हणजे रक्त... ते शहरी भागात किमान काही खटाटोप करून उपलब्ध तरी होते; पण ग्रामीण भागात तर त्याबद्दल अंधारच! मग अशा वेळी नोकरी, शिक्षण यासारखे वेगवेगळे कार्यक्षेत्र सांभाळत सामाजिक कार्यात विविध उपक्रम राबविणाऱ्या तीन मित्रांनी लव केअर शेअर फाउंडेशन संस्थेअंतर्गत एक अभियान सुरू केले. या अभियानाचे नाव ‘ब्लड डोनर्स नेटवर्क इंडिया’. या नावाने त्यांनी ग्रुप तयार केला असून, ते देशपातळीवर कार्यरत असेल. त्यामुळे देशातील कोणालाही या अॅपवरून रक्ताची मागणी नोंदवता येईल. टेलिग्राम अॅपवर त्यांनी ग्रुप तयार केला आहे. त्यातून रक्ताची सर्व माहिती समजणार आहे.
ब्लड डोनर्स नेटवर्क इंडिया अभियान म्हणजे ज्यांच्याकडे रक्त आहे आणि ज्यांना त्याची गरज आहे, या दोघांमधील दुवा.. जवळपास दीडशेपेक्षा जास्त लोकांची ही संस्था समाजात सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून चांगले काम करता येते, याचे उत्तम उदाहरण होय. व्यवस्थित काम, जबाबदारी, सुटी यांचे सुरेख नियोजन करून समाजात रक्तासाठी माणसे जोडण्याचे काम ते करीत आहेत. सहभागी सभासदांच्या राहत्या घराच्या ठिकाणानुसार माणसांची साखळी निर्माण करून कमीत कमी वेळेत अत्यावश्यक रुग्णाला रक्त कसे उपलब्ध होईल, यासाठी हे लोक दिवसरात्र प्रयत्नशील आहेत. सोशल मीडियातील फेसबुक, टेलिग्राम या दोन माध्यमांतून लोकांना एकत्र आणून, या मोहिमेचा भाग बनवून रक्ताला बांधील करतात. पीयूष शहा, करण हजारे या मित्रांची ही संकल्पना.
करण हजारे म्हणाला, ‘‘काही दिवसांपूर्वी जवळच्या एका मित्राला रक्ताच्या अनुपलब्धतेमुळे काय संकट ओढवू शकते, याचा प्रत्यय आला आणि आम्हाला समाजातील महत्त्वाची समस्या असलेल्या रक्ताची रुग्णाच्या आयुष्यातील कठीण परिस्थितीत भासणारी निकड, अडचण काय असू शकते, याची जाणीव झाली आणि त्यातून आम्ही विचारविनिमय करून ब्लड डोनर्स नेटवर्क इंडिया अभियानाची सुरुवात केली. त्यानंतर मयूरेश बरबडे, राजकुमार पाटील, सार्थक भोकरे, आदित्य भट यांनी उपक्रमाची दिशा ठरवली.’’ त्यांना राम बांगड यांचेही या कार्यात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळते.
पीयूष शहा म्हणाला, ‘‘या उपक्रमाचा भाग होण्यासाठी हिंदी व इंग्लिश अशा दोन भाषांमध्ये असलेले आॅनलाईन पद्धतीने फॉर्म भरून द्यावे लागतात. गरज असेल त्या ठिकाणी तुम्ही रक्त देऊ शकता, कारण तुमची आमच्या संस्थेत नोंद आहे. अशा प्रकारे त्या रुग्णाला तुमची मोलाची मदत होऊ शकते. मुली व मुले अशा दोन ग्रुपमध्ये हे काम सुरू आहे. मुलांनी काम करताना संस्थेचे काही नियम ठरवले आहेत, त्यांचे पालन करणे बंधनकारक आहे. या उपक्रमात किती ठिकाणी रक्ताची गरज आहे आणि नियमित रक्तदानाची आकडेवारीयुक्त नोंद ठेवली जाईल.’’
नोंदणीनंतर देशभर रक्तदान करता येणार
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी टेलिग्रॅम ग्रुपवर तुम्हाला हिंदी व इंग्लिश अशा दोन भाषांत उपलब्ध असलेले आॅनलाईन फॉर्म भरावे लागतील. त्यानंतर उपक्रमात नोंदणी केली जाईल. पिनकोड, लोकेशन, नाव, ब्लड ग्रुप या माहितीचा त्यात समावेश असेल. तुमची रजिस्टर नोंदणी झाल्यानंतर देशातील कोणालाही रक्तदान व रक्तासाठी गरज म्हणून येथे नोंद करता येईल.