राष्ट्रवादीत गटबाजीचे दर्शन
By admin | Published: July 28, 2014 04:57 AM2014-07-28T04:57:45+5:302014-07-28T04:57:45+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीचे दर्शन चिंचवड येथील राष्ट्रवादीच्या बैठकीत रविवारी घडले.
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीचे दर्शन चिंचवड येथील राष्ट्रवादीच्या बैठकीत रविवारी घडले. सत्तारूढ राष्ट्रवादीच्या महापालिकेतील संख्याबळापैकी एक चतुर्थांशही नगरसेवक बैठकीस उपस्थित नव्हते. काहींनी थेट शहराध्यक्षांना लक्ष्य केल्याने ‘मला पदाची हाव नाही. तुम्हीच नाव सुचवा’ असे आव्हान दिले. स्थानिक नेत्यांनी फिरवलेली पाठ, नाराज कार्यकर्त्यांनी शहराध्यक्षांना केलेले लक्ष्य, आरोप-प्रत्यारोपांमुळे बैठक गाजली.
राष्ट्रवादी शहरातील प्रमुख कार्यकर्ते, नगरसेवक, पदाधिकारी यांची बैठक चिंचवड येथील दर्शन हॉलमध्ये झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिचे आयोजन केले होते. वेळ सकाळी दहाची. प्रत्यक्षात दुपारी बाराला बैठक सुरू झाली. अध्यक्षस्थानी पक्ष निरीक्षक कृष्णकांत कुदळे होते. व्यासपीठावर प्रवक्ते अंकुश काकडे, आमदार विलास लांडे, प्रदेश उपाध्यक्ष वसंत वाणी, शहराध्यक्ष योगेश बहल, माजी महापौर आर. एस. कुमार, अनिता फरांदे, ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुरेखा लांडगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मयूर कलाटे, स्थायी समिती अध्यक्ष महेश लांडगे आदी उपस्थित होते.
शहराध्यक्ष संतापले
आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी थेट शहराध्यक्षांना लक्ष्य केले. ‘पक्ष संघटनेत मरगळ येण्यासाठी शहराध्यक्ष कारणीभूत आहेत, असा हल्ला जगतापांनी चढविला. बंडखोरांकडून झालेल्या आरोपामुळे बहल संतापले. ‘शहराध्यक्षपद सोडण्यास तयार आहोत. पक्षाचे हित असल्यास शहराध्यक्ष बदलला तरी चालेल. या पदाची हाव मला नाही. आपणच नाव सुचवावे,’ असे आवाहन केले.
ज्येष्ठ नगरसेविका शमीम पठाण यांनी चिंचवड मतदारसंघही राष्ट्रवादीला मिळायला हवा, अशी मागणी केली. त्यावर अंकुश काकडे म्हणाले, ‘‘चिंचवड मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा, ही आग्रही मागणी असली, तरी त्याबाबतचा निर्णय दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील. आगामी विधानसभा निवडणुका सोप्या नाहीत. लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांना देखील मतांसाठी झगडावे लागले होते. हेवेदावे विसरून निवडणुकीच्या तयारीला लागावे.’’
तुम्हीच आत्मपरीक्षण करा...
बहल म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत ठिकठिकाणी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला कमी मते मिळाली. इतकेच काय ज्यांनी लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा दिला, त्यांच्या प्रभागातही शिवसेनेला जास्त मते मिळाली. यामागील कारणे शोधून आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर
कारवाई केली असती, तर आज ही वेळ आली नसती. पक्षविरोधी काम करणाऱ्यांनी आमच्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न करू नये.
लोकसभा निवडणुकीत बंडखोरांना साथ देणारे टीका करीत असेल तर योग्य नाही.’’(प्रतिनिधी)