कशेडीतील बाेगद्याच्या ‘गळती’साठी ग्राउटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 10:14 AM2024-06-30T10:14:53+5:302024-06-30T10:15:34+5:30
गतवर्षी गणेशोत्सव कालावधीत यापैकी एका बोगद्यातून पहिल्यांदा हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली होती;
हर्षल शिरोडकर
लाेकमत न्यूज नेटवर्क, खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील अवघड कशेडी घाटाला पर्याय म्हणून बांधण्यात येत असलेल्या कशेडी बाेगद्याला लागलेली गळती थांबविण्यासाठी ग्राउटिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. खेड तालुक्यातील कशेडी ते पोलादपूर तालुक्यातील भोगाव या दरम्यान जाण्या-येण्यासाठी दोन स्वतंत्र बोगदे तयार केले जात आहेत. गतवर्षी गणेशोत्सव कालावधीत यापैकी एका बोगद्यातून पहिल्यांदा हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली होती; मात्र या बोगद्याची काही किरकोळ कामे अपूर्ण असल्याने गणेशोत्सवानंतर ही वाहतूक बंद करण्यात आली हाेती. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा या बोगद्यातून हलक्या प्रवासी वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, पहिल्याच पावसात बाेगद्यात गळती लागल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.
डोंगरावरील भागाची येत्या काही दिवसांत पाहणी केली जाणार आहे. त्यासाठी आयआयटी मुंबईचे प्रा. एस. के. यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या ठिकाणी विहिरी, विंधन विहिरी किंवा झरे असल्यास ते पाणी अन्यत्र कसे वळवले जाईल, या दृष्टीने नियोजन केले जाणार आहे. पुढील महिन्याभरात हा अभ्यास पूर्ण होईल. - पंकज गोसावी, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग