इंदापूरमधील बाधितांची वाढती संख्या चिंतेची बाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:08 AM2021-07-04T04:08:11+5:302021-07-04T04:08:11+5:30
इंदापूर : तालुक्यात कोरोना बाधितांची रुग्णसंख्या अचानक वाढत आहे. ही तालुक्यासाठी चिंतेची बाब आहे. कोरोना संपला आहे, या गैरसमजात ...
इंदापूर : तालुक्यात कोरोना बाधितांची रुग्णसंख्या अचानक वाढत आहे. ही तालुक्यासाठी चिंतेची बाब आहे. कोरोना संपला आहे, या गैरसमजात नागरिकांनी बेफिकीरपणे वागू नये. कोरोनाची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा प्रयत्न करीत आहे, मात्र नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. असे आवाहन सार्वजनिक बांधकाम व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात शनिवारी (दि. ३ जुलै) रोजी कोरोना नियंत्रण आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, मुख्याधिकारी रामराजे कापरे, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे पाटील, कार्याध्यक्ष अतुल झगडे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, तालुका उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर उपस्थित होते.
दत्तात्रय भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यात शुक्रवारी ६१ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजही तालुक्यातील एकूण २६६ व्यक्तींवर उपचार सुरु आहेत. यात ग्रामीण भागातील २३६ तर शहरी भागातील ३० नागरिकांचा समावेश आहे. तर म्युकरमायकोसिसचे एकूण १६ रुग्ण तालुक्यात आढळून आले असून, यापैकी २ रुग्ण मृत्यू पावले आहेत तर ११ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
आज शनिवार (दि. ३ जुलै) रोजी तालुक्यातील परिस्थिती गंभीर असून १० पेक्षा अधिक रुग्ण असलेली निमगांव केतकी, भिगवण, बिजवडी आणि खोरोची ही चार गावे हॉटस्पॉट आहेत. तालुक्यातील रुग्ण संख्या वाढू नये यासाठी पोलीस विभागाने कडक निर्बंध करावेत. वेळ पडली तर कायद्याचा कडक वापर करा, पण ही परिस्थिती आटोक्यात आणा, अशी सूचना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पोलीस प्रशासनास दिली.
१०० पेक्षा अधिक कर्मचारी असणाऱ्या आस्थापनांच्या ठिकाणी चाचणी
आरोग्य तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेला, प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभाग व प्रशासन सज्ज झाले आहे. लहान मुलांसाठी राखीव बेड ठेवले आहेत. तसेच आरोग्य विभागाने जागृत राहून तालुक्यातील वाढती रुग्ण संख्या जास्तीत जास्त टेस्टिंग करुन, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्या ठिकाणी शंभरपेक्षा अधिक कामगार असलेल्या सर्व आस्थापना ठिकाणची आर.टी.पी.सी.आर. चाचणी करावेत. तसेच कोणतीही आस्थापना या चाचणीतून शिल्लक राहू नये. असे कडक आदेश राज्यमंत्री भरणे यांनी प्रशासनास दिले आहेत.