क्रिप्टोकरन्सीमुळे ब्लॉकचेनमध्ये वाढत्या संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 03:09 PM2022-06-09T15:09:52+5:302022-06-09T15:10:02+5:30

ब्लॉकचेन तंत्रज्ञानात भविष्यात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होणा...

Growing opportunities in blockchain due to cryptocurrency | क्रिप्टोकरन्सीमुळे ब्लॉकचेनमध्ये वाढत्या संधी

क्रिप्टोकरन्सीमुळे ब्लॉकचेनमध्ये वाढत्या संधी

Next

- डॉ. दीपक शिकारपूर, संगणक तज्ज्ञ

काळाचा बदलता चेहरा त्या-त्या दिवसांत वापरल्या जाणाऱ्या वस्तूंकडे आणि उपकरणांकडे नजर टाकली की लगेचच दिसतो. तांत्रिक प्रगतीच्या संदर्भात, इतके दिवस औद्योगिक क्षेत्राकडे झुकलेली परिमाणे आता तितक्याच गतीने घरगुती आणि ग्राहकोपयोगी वस्तू तसेच सेवासुविधांनाही लागू होत आहेत. ही साधने आणि सुविधा स्मार्ट होत आहेत हे आपण सगळेजण पाहतो व अनुभवतोही. क्रिप्टोकरन्सीमुळे सध्या ब्लॉकचेन हा शब्द आपण सर्व जण वारंवार ऐकत आहोत. जगभरातल्या आर्थिक व्यवहारांचा आणि अर्थव्यवस्थेचा चेहरामोहराच या तंत्रज्ञानामुळे बदलला आहे. सध्या जग ज्या वेगाने सगळ्या गोष्टींचं डिजिटायझेशन करत आहे ते पाहता ब्लॉकचेन तंत्रज्ञानात भविष्यात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सर्वांनी यामध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने आतापासूनच विचार करणं गरजेचं आहे. हे तंत्र सुरक्षेसाठी डिजिटायझेशनच्या अनेक डोमेनमध्ये वापरले जाते. उदा. दुबई सरकार याच तंत्राचा वापर दस्तावेज साठवणीसाठी करत आहेत. ब्लॉकचेन तंत्र ही एक सुरक्षित सार्वजनिक खातेवही आहे. जिथे अधिकृत यूजर आपली माहिती सुरक्षित साठवू शकतो. अनेक परदेशी विद्यापीठे गुणपत्रिका व पदव्या कागदावर न देता ब्लॉकचेन तंत्र वापरून क्लाउडवर साठवत आहेत. विद्यार्थी त्या डाउनलोड करू शकतात व उद्योग त्याच्या वैधतेची तपासणी ऑनलाईन करू शकतात.

ब्लॉकचेनशी संबंधित करिअरमध्ये ब्लॉकचेन डेव्हलपर, ब्लॉकचेन सोल्युशन आर्किटेक्ट, ब्लॉकचेन क्वालिटी इंजिनिअर, ब्लॉकचेन यूएक्स डिझायनर, क्रिप्टोकरन्सी कम्युनिटी मॅनेजर यांचा समावेश होतो. ब्लॉकचेनची मागणी वाढत असल्यामुळे, अनुभवी ब्लॉकचेन डेव्हलपर्सची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे प्रोग्रामिंगमध्ये कुशल व्यक्तींसाठी या क्षेत्रात चांगल्या संधी आहेत. ब्लॉकचेनसाठी योग्य डिझायनिंग आणि त्याचं पूर्ण सोल्यूशन तयार करणंही गरजेचं आहे. ब्लॉकचेन सोल्यूशन आर्किटेक्ट हेच काम करतात. प्रोग्रॅमर्स, नेटवर्क ॲडमिन्स आणि यूआय डिझायनर्सच्या टीमचं नेतृत्व करणं हे ब्लॉकचेन सोल्यूशन आर्किटेक्टचं काम असतं. सोल्यूशन आर्किटेक्ट व्यतिरिक्त आणखी एका कौशल्याची संघाला गरज भासते, ते म्हणजे यूएक्स डिझायनर. यांचं काम ब्लॉकचेनचा यूजर इंटरफेस व एक्सपिरिअन्स अधिकाधिक चांगला करणं आणि त्यासाठी सुलभ असा युजर इंटरफेस तयार करणं असं असतं. जेवढा चांगला यूजर इंटरफेस, तेवढे वापरकर्ते अधिक. त्यामुळेच ब्लॉकचेन यूएक्स डिझायनरचीही मागणी मोठ्या प्रमाणात आहे.

क्रिप्टोकरन्सीचं भविष्य पाहता सध्या क्रिप्टोकरन्सी कम्युनिटी मॅनेजरची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एक्सचेंज आणि ग्राहकांमधील संबंध चांगले आणि कायम ठेवण्याचं काम क्रिप्टोकरन्सी कम्युनिटी मॅनेजर करतो. बी.कॉम, बीबीए, एमबीए (वित्त) शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी ह्याचा जरूर विचार करावा. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाला नक्कीच चांगले भविष्य आहे कारण व्यवसायांना आर्थिक व्यवहारांवर अधिक सुरक्षितता आवश्यक आहे. अनेक विद्यापीठे ह्या तंत्राचा इलेक्टिव्ह विषय म्हणून समावेश करत आहेत . काही विद्यापीठांनी एक वर्षाचे पदव्युत्तर कौशल्य अभ्यासक्रम विकसित केले आहेत . अनेक ऑनलाईन व दूरशिक्षण पर्याय ही उपलब्ध आहेत.

Web Title: Growing opportunities in blockchain due to cryptocurrency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.