मराठी माध्यमांच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा वाढतोय कल
By admin | Published: April 26, 2017 02:48 AM2017-04-26T02:48:51+5:302017-04-26T02:48:51+5:30
राज्यात शिक्षणक्षेत्राचा खेळखंडोबा झाला असल्याच्या चर्चेने जोर धरला असतानाच शासनाची ध्येय आणि धोरणे मराठी माध्यमांच्या शाळांना
बेल्हा : राज्यात शिक्षणक्षेत्राचा खेळखंडोबा झाला असल्याच्या चर्चेने जोर धरला असतानाच शासनाची ध्येय आणि धोरणे मराठी माध्यमांच्या शाळांना मारक ठरत असल्याचे समोर आले. मात्र मराठी माध्यमांच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
सध्या राज्यात इंग्रजी शाळांचे पेव फुटले असून राज्य शासनाने इंग्रजी माध्यमांच्या शाळांना परवानगी देताना जराही आखडता हात घेतला नाही. कोणत्याही शाळेला परवानगी देताना दोन शाळांमधील अंतर कमीत कमी चार किलोमीटर असावे, असा निकष आहे. मात्र हा निकष फक्त मराठी माध्यमांच्याच शाळांना लागू करण्यात आला आहे. इंग्रजी शाळांना मात्र यामधून सवलत मिळाल्यामुळे भांडवलदारांनी गावागावातून इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभ्या केल्या. या शाळांना परवानग्या देताना दोन शाळांमधील अंतराचा निकष का लागू नाही? लागू असेल तर या शाळांना परवानगी कशी देण्यात आली? हा संशोधनाचा विषय आहे. पालक आणि त्यांच्या मुलांना इंग्रजी शाळांचे आकर्षण असल्यामुळे अनेक पालक भरमसाट फी भरून त्यांची मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे वाढला असल्यामुळे त्यांनी मराठी माध्यमांच्या शाळांकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येत होते.
पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढला असल्यामुळे मराठी माध्यमातील शाळांमधील विद्यार्थीसंख्या रोडावली आहे. त्यामुळे शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. (वार्ताहर)