शहरातील कोरोनाबाधितांचा वाढीचा दर ५.८५ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:08 AM2021-06-28T04:08:57+5:302021-06-28T04:08:57+5:30
पुणे : कोरोना रुग्णसंख्या घटल्याने पुणे शहरातील लॉकडाऊनमध्ये गेल्या पंधरा दिवसांत मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात आली़ मात्र, याचा ...
पुणे : कोरोना रुग्णसंख्या घटल्याने पुणे शहरातील लॉकडाऊनमध्ये गेल्या पंधरा दिवसांत मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात आली़ मात्र, याचा परिणाम पुन्हा कोरोना रुग्ण संख्या वाढविण्यावर झाला असून, शहरातील दिवसाचा कोरोनाबाधितांच्या वाढीचा सरासरी दर हा ५़ ८५ टक्के इतका झाला आहे़
शहरातील कोरोनाबाधितांच्या वाढीचा खाली गेलेला आलेख पुन्हा डोके वर काढू लागला असून, गेल्या आठवड्यात म्हणजे २० जूनपासून यात लहान-मोठ्या प्रमाणात यात वाढ होत गेली़ परिणामी, २३ जून रोजी २ हजार ३७५ वर गेलेली शहरातील सक्रिय रुग्णसंख्याही पुन्हा वाढली आहे. ती शुक्रवारी अडीच हजाराच्या पुढे गेली होती़ तर सध्या कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या व नव्या कोरोनाबाधितांची संख्याही कमी-जास्त प्रमाणात सारखीच असून, गेल्या आठवड्यात तीन वेळा कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा अधिक दिसून आली़ कोरोनाच्या दुसरी लाट ओसरत चालली असतानाच, प्रथमच गेल्या आठवड्यात ही तफावत दिसून येऊ लागली आहे़
शहरात सध्या दिवसाला सरासरी ५ कोरोनाबाधितांचा मृत्यू होत असून, शहराचा मृत्यू दर हा १़ ६० टक्क्यांवरून १़ ७९ टक्क्यांवर गेल्या सात दिवसांत कायम राहिला आहे़ शहरातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ९७़ ६८ टक्के रुग्ण हे कोरोनामुक्त झाले ही शहरासाठी सुखावह गोष्ट असली तरी, गेल्या काही दिवसांपासून वाढणारी रुग्णसंख्या पुन्हा चिंतेत भर घालणारी ठरत आहे़
--------------------
४़ ७७ वर आलेला दर पुन्हा ५़ ८५ टक्क्यांवर
शहरात २१ मे ते २७ मे दरम्यान तपासणीच्या तुलनेत सरासरी ७़ ८० टक्के संशयित हे कोरोनाबाधित आढळून येत होते़ हा टक्केवारी दर २८ ते ३ जून या आठवड्यात ६़ ११ वर आला़ तर ४ जून ते १० जून दरम्यान ही बाधितांची टक्केवारी ४़ ८२ वर आली व ११ जून ते १७ जूनपर्यंत ती कायम राहून ४़ ८५ टक्के इतकीच राहिली होती़
राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाबाधितांची वाढ ही ५ टक्क्यांच्या आत असलेल्या शहरातील निर्बंध शिथिल करण्यात आले़ परंतु, २४ जूनपर्यंत ४़ ७७ टक्क्यांवर असलेला हा दर पुन्हा ५ टक्क्यांच्या पुढे गेला असून, तो आजमितीला ५़ ८५टक्के इतका झाला आहे़
----------------------------