लैैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ, मुलांच्या संरक्षणाकडे पालक आणि शाळांचे होतेय दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 07:08 AM2017-10-30T07:08:24+5:302017-10-30T07:08:28+5:30
कोवळ्या सुकुमार वयामध्ये अल्पवयीन मुलांवर होणा-या लैैंगिक अत्याचारांच्या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घटनांमुळे समाजात फोफावणा-या या विकृतीला आळा
पुणे : कोवळ्या सुकुमार वयामध्ये अल्पवयीन मुलांवर होणा-या लैैंगिक अत्याचारांच्या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घटनांमुळे समाजात फोफावणा-या या विकृतीला आळा घालण्यासाठी सामाजिक स्तरावर प्रयत्न करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
खेळण्या-बागडण्याच्या वयात लैंगिक अत्याचाराचा सामना कराव्या लागल्यामुळे मुलांमध्ये मानसिक अस्वास्थ्य येऊ लागले आहे. आपली मुले शाळा, शिकवण्या, घर आणि घराच्या आसपास तरी सुरक्षित आहेत का? या कल्पनेनेच त्यांच्या अंगावर काटा येऊ लागला आहे. गेल्या चार वर्षांत पुण्यासारख्या पुरोगामी आणि सुधारणावादी शहरामध्येही बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे अडीच वर्षीय चिमुकलीचे घरामधून अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर खून करण्यात आला. अत्यंत अमानवी आणि निर्घृण कृत्यामुळे पुणेकर हादरून गेले आहेत. या घटनेमुळे पोलीसही सुन्न झाले आहेत.
गेल्या सहा महिन्यांतील ही सर्वांत खळबळजनक घटना असली तरी बाललैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असल्याचे दिसून येत आहे. अनेक घटना कुटुंबाची इभ्रत जाईल, बदनामी होईल या भीतीने पोलिसांत दिल्या जात नाहीत.
अनेक जणांवर तर मुलांवर अशा प्रकारचे अत्याचार झाल्यानंतर घर सोडून जाण्याची वेळ येते. अल्पवयीनांपासून ते वृद्धापर्यंतचे विकृत अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी झालेले आहेत. केवळ पुरुषच नव्हे तर स्त्रियाही अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी असल्याचे समोर आले आहे.
सिंहगड रस्त्यावरील घटनेमुळे शहर ढवळून निघाले आहे. सिंहगड स्कूलमधील दुसरीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाने लैंगिक अत्याचार केल्यामुळे मोठा गदारोळ झाला होता. तर अशाच प्रकारच्या घटना वानवडी आणि कोंढव्यात उघडकीस
आल्या होत्या. लहान मुलांवर अत्याचार करणाºयांमध्ये ओळखीच्यांचे आणि नातेवाइकांचे प्रमाण अधिक आहे. पालकांचे प्रमाणही लक्षणीय आहे. यामध्ये वडील, भाऊ, मामा, काका, आजोबा अशा नात्यांचाही समावेश आहे. अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये सर्वाधिक आरोपी हे १७ ते ४० वयोगटांतील आहेत.
या सर्व घटना पाहता लहान मुलांची सुरक्षा नेमकी कोणावर सोपवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, केवळ
पोलीस या घटनांना पायबंद घालू शकतील, अशी समाजामधील सध्याची परिस्थिती नाही. कायदा सुव्यवस्थेपेक्षाही हा सामाजिक प्रश्न म्हणून पाहिला जाण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
लहान मुलींवर बलात्कार केला तर पुरुषाला असलेले गुप्तरोग दूर होतात अशी एक अंधश्रद्धा असते. त्यातच बाईकडे आजही वस्तू म्हणूनच पाहिले जात असल्याने ही छोटीशी वस्तू उचलली तरी ती ओरडणार नाही किंवा किंचाळणार नाही अशी एक मानसिकता त्यामागे असू शकते. मुळातच लहान मुलींवर अत्याचार केल्याने काय आनंद पुरुषाला मिळतो? या विकृतीमागची कारणे काय आहेत, याचा अभ्यास व्हायला हवा. तर काहीतरी ठोस उपाययोजना करता येतील. राज्य महिला आयोगाने या गुन्हेगारांच्या मानसिकतेचा केस स्टडी करण्याची मागणी केली पाहिजे.
- विद्या बाळ,
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या
लहान मुलांवरील लैैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत हे खरे आहे. शाळेत एखाद्या मुलावर लैैंगिक अत्याचार झाला असेल तर शाळा प्रशासनाला याची वाच्यता व्हायला नको असते. यासाठी शाळा, वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये जाणीव जागृती कार्यक्रम राबविणे हाच त्यावरील प्रतिबंधक उपाय आहे, त्यासाठी आम्ही स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने वस्त्या तसेच शाळांमध्ये अनेक वर्षांपासून जाणीव जागृती कार्यक्रम घेत आहोत. शाळांमध्ये आम्ही सेशन घेतो तेव्हा मुले नकळतपणे बोलून जातात. तेव्हा त्यांना धीर देऊन बोलते करण्याचा प्रयत्न करतो. मुलांना प्रेम, आकर्षण आणि मैत्री या भावना त्यांना उमजेल अशा भाषेत समजावून सांगण्याचीही आज गरज आहे. मुलांना खूप गोष्टी जाणून घ्यायच्या असतात, अशा माहितीसाठी किंवा काहीतरी सांगण्यासाठी आमच्या हेल्पलाईनवर महिन्याला १00 कॉल्स येतात
- नंदिनी अंबिके,
कार्यकारी संचालक, फाउंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन