पावणेपाच कोटींचा जीएसटी थकविणाऱ्या उद्योगपतीवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:07 PM2018-03-17T12:07:21+5:302018-03-17T12:07:21+5:30
येरवड्यातील व्यावसायिकाने कर, व्याज व दंड असे मिळून एकूण ४ कोटी ७६ लाख ७७ रुपये थकबाकी रक्कम भरलेली नाही.
पुणे : पावणेपाच कोटींचा विक्रीकर आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) बुडवल्याप्रकरणी येरवड्यातील व्यावसायिकाविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राहुल रमेश टाटीया (रा. मुकुंदनगर) असे आरोपीचे नाव आहे.
सहायक राज्यकर आयुक्त किरण जाधव (वय ३०, रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. टाटीया याचा मेसर्स काँटिनेन्टल सेल्स अॅण्ड सर्व्हिसेस नावाने केमिकल विक्रीचा व्यवसाय आहे. त्याने आर्थिक वर्ष २००९-२०१० पासून आजवर विक्रीकर व वस्तू व सेवा कर भरला नाही. त्याची रक्कम सुमारे दीड ते पावणेदोन कोटी इतकी आहे. त्यावर कर, व्याज व दंड असे मिळून एकूण ४ कोटी ७६ लाख ७७ रुपये होतात. ही रक्कम शासकीय तिजोरीत न भरता त्याचा वैयक्तिक वापर करून सरकारची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अनिल लोहार तपास करत आहेत.