लाच घेताना जीएसटी चे सहायक आयुक्त जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 04:02 PM2018-03-21T16:02:50+5:302018-03-21T16:02:50+5:30
तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २० मार्च रोजी तक्रार केली़ .त्यानुसार त्याची पडताळणी करण्यात आली़. तेव्हा तडजोड म्हणून त्यांनी ३० हजार रुपये घेण्याचे मान्य केले़.
पुणे : नियमाप्रमाणे व्हॅट भरला असतानाही तक्रारदारांच्या असेसमेंट आॅर्डर विरुद्ध अपिलामध्ये न जाण्यासाठी जीएसटी कार्यालयातील सहायक आयुक्त प्रसाद पुरुषोत्तम पाटील (वय ४८, रा़ प्रसादनगर, वडगाव शेरी ) यांना ३० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़.
याबाबतची माहिती अशी, तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर आहेत़ त्यांनी २०१३ मध्ये वानवडी येथे महापालिकेचे बांधकामाचे एक काम घेतले होते़. त्यावेळी सिव्हिल वर्क कामावर ५ टक्के व्हॅट होता़ त्याप्रमाणे हा कर तक्रारदारांनी भरलेला होता़. परंतु, सहायक आयुक्त प्रसाद पाटील यांनी तुम्ही भरलेला टॅक्स कमी भरला आहे़. तो ८ टक्के प्रमाणे भरायचा आहे़. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी असेसमेंटची मागणी केली़. त्यावेळी पाटील यांनी तुम्हाला जरी अपिल करायचे असेल तर त्यासाठी अगोदर उरलेला व्हॅट व दंड असे १७ लाख रुपये भरावे लागतील, असे सांगितले़. जर यातून तुम्हाला मार्ग काढायचा असेल तर ४५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी लाचेची मागणी केली़ . तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २० मार्च रोजी तक्रार केली़ .त्यानुसार त्याची पडताळणी करण्यात आली़. तेव्हा तडजोड म्हणून त्यांनी ३० हजार रुपये घेण्याचे मान्य केले़. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी येरवडा येथील जी़ एस़ टी कार्यालयात सापळा रचला़. तक्रारदार यांच्याकडून तेथील कँटीनमध्ये ३० हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले़. पोलीस निरीक्षक राजू चव्हाण, एस़ एस़ घार्गे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली़ कारवाईनंतर पोलीस पथकाने पाटील यांच्या वडगाव शेरी येथील घरामध्ये शोध सुरु केला आहे़