पूरग्रस्तांना सोडून सांगलीचे पालकमंत्री पुण्यात?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 08:54 PM2019-08-08T20:54:11+5:302019-08-08T20:55:08+5:30

पुरग्रस्तांना सोडून मी पुण्यात आल्याच्या चर्चांमध्ये अर्थ नाही...

Guardian minister of Sangli subhash deshmukh leaving flood victims in Pune? | पूरग्रस्तांना सोडून सांगलीचे पालकमंत्री पुण्यात?

पूरग्रस्तांना सोडून सांगलीचे पालकमंत्री पुण्यात?

Next
ठळक मुद्देसुभाष देशमुखांची पक्ष बैठकीत उपस्थिती

पुणे : पुरात अडकलेल्या सांगलीला वाऱ्यावर सोडून सांगलीचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री सुभाष देशमुख पुण्यात भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बैठकीला गुरूवारी (दि. ८) उपस्थित राहिले. यावेळी मतदारांबरोबर संपर्क कसा ठेवायचा याबद्दल बूथकेंद्र कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक होती.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर डीपी रस्त्यावरील एका कार्यालयात ही बैठक झाली. पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे संघटनात्मक पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. देशमुख यांच्याकडे भाजपात पुणे शहराचे प्रभारी म्हणून संघटनात्मक जबाबदारी आहे. मात्र ते पालकमंत्री असलेली सांगली सध्या अभुतपूर्व पुरात बुडालेली आहे. गुरुवारीच सांगलीत बोट बुडून नागरिकांच्या मृत्यूची दुर्घटना घडली. सांगलीकरांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून पिण्याचे पाणी, वीज, अन्न, निवारा या मुलभूत गरजांसाठी त्यांचा संघर्ष चालू आहे. अशावेळी सांगलीकरांचे दु:ख हलके करण्यासाठी सांगलीत उपस्थित राहण्याऐवजी पुण्यातल्या भाजपाच्या बैठकीला देशमुखांनी प्राधान्य दिले. 
भाजपाचे प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक यांनी या बैठकीत शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्याकडून पुण्यातील संघटनेच्या कामकाजाची माहिती घेतली. खासदार गिरीश बापट यांच्यासह पुण्यातील भाजपाचे सहाही आमदार तसेच प्श्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, महापौर मुक्ता टिळक, प्रदेश चिटणीस धीरज घाटे आदी यावेळी उपस्थित होते.
शक्तीकेंद्र प्रमुख, त्यांच्या कामाची पद्धत, बैठक, बूथ समितीचे कामकाज, सरकारच्या योजना मतदारांपर्यंत पोहोचविणे, बूथप्रमुखांची २३ कामे, शक्तीकेंद्र प्रमुखांची ११ कामे, पक्षाचे कार्यक्रम याचा आढावा पुराणिकांनी घेतला. प्रत्येक मतदाराच्या नियमीत संपर्कात राहण्याची सवय बूथ पदाधिकाऱ्यांनी लावून घ्यावी, मतदारयादीचे अभ्यासपुर्वक विश्लेषण करावे अशा सुचनाही त्यांनी दिल्या. गोगावले यांनी बैठकीचे सुत्रसंचालन केले. 

सांगलीतूनच आलो
पक्षाच्या बैठकीनंतर सुभाष देशमुख यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतलेल्या पूर आढावा बैठकीस उपस्थिती लावली. यावेळी पत्रकारांनी त्यांना सांगलीतील अनुपस्थितीबद्दल छेडले असता देशमुख म्हणाले, सांगलीतील सरकारी यंत्रणेच्या मी सातत्याने संपर्कात आहे. आज सकाळीच मी तिथून पुण्यात आलो. संध्याकाळी पुन्हा सांगलीलाच जाणार आहे. पूरग्रस्तांसाठी मदत मिळवण्यासाठी मी पुण्यात आलो होतो. पुरग्रस्तांना सोडून मी पुण्यात आल्याच्या चर्चांमध्ये अर्थ नाही. 
...........

Web Title: Guardian minister of Sangli subhash deshmukh leaving flood victims in Pune?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.