पालकमंत्री म्हणतात, जपून वापरा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 04:09 AM2018-12-15T04:09:15+5:302018-12-15T04:09:37+5:30
मोर्चे-आंदोलनाने काही होणार नाही; धरणांत २० टक्के कमी पाणीसाठा
पुणे : पुण्याचे निम्याहून अधिक पाणी कमी केल्याने पुणेकरांमध्ये प्रचंड संताप आणि धास्ती असताना पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठा वाढविण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. महापालिका आयुक्त यावर अपील करणार आहेत. धरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के पाणीसाठा कमी आहे. मोर्चे, आंदोलने करून धरणातील पाणीसाठ्यात वाढ होणार नाही. माझ्या घरासह प्रत्येक पुणेकराला पाणी जपून वापरावे लागणार आहे. लोकप्रतिनिधींनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन गिरीश बापट यांनी केले.
स्मार्ट सिटी अॅडव्हायझरी फोरमची दुसरी बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बापट म्हणाले, सध्या पाण्यावरून शहरी-ग्रामीण वाद सुरु आहे. परंतु धरणातील शिल्लक पाणीसाठा लक्षात घेता प्रत्येकाला पाणी अत्यंत जपून वापरावे लागणार आहे. खडकवासला धरणाच्या उजव्या कालव्यातून उसासाठी पाणी सोडले जाते असा गैरसमज पसरविला जात आहे. परंतु ग्रामीण भागात देखील पाण्याची गंभीर परिस्थिती असून, तेथील लोकसंख्येला पिण्यासाठी व जनावरांच्या चारा-पाण्यासाठी हे पाणी सोडण्यात येते आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणने गुरुवारी दिलेल्या आदेशाविरोधात महापालिका आयुक्त अपील करणार आहेत.
खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये शिल्लक असलेला पाणीसाठा पुढील पावसाळ्यापर्यंत घालवण्यासाठी नियोजन केले जात आहे. धरणात असलेला पाण्याचा साठा लक्षात घेऊन ग्रामीण व शहरी नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरणे गरजेचे आहे. शहरातील पाईपलाईन गेली तीस वर्षांपासून खराब झालेली असल्याने वाया जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी आहे. त्याचबरोबर शहरातील पाणी वितरण पद्धतीत आणि वॉल सोडण्याच्या पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पिण्याचे पाणी गाड्या धुण्यासाठी आणि बागांसाठी वापरले जाता कामा नये. बेबी कॅनॉल आणि उजव्या कालव्याची दुरुस्ती केली जाणार आहे. ही दुरुस्ती केल्यानंतर ग्रामीण आणि शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल. टेमघर धरणाच्या गळतीमुळे ते रिकामे करण्यात आले आहे. त्याची दुरुस्ती झाल्यानंतर ३ टीएमसी पाणी मिळेल.
शहरात पाण्याची ही परिस्थिती कुणाच्याही चुकीमुळे निर्माण झालेली नाही, तर निसर्गामुळे निर्माण झाली आहे. शहराला मिळणारे पाणी ११५० एमएलडीच्या खाली येणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दरम्यान, महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणने गुरुवारी दिलेल्या आदेशाविरोधात महापालिका आयुक्त लवकरच अपील करणार असल्याचे बापट यांनी येथे सांगितले.