पालकमंत्र्यांची वेताळ टेकडीबाबत डबलढाेलकी; महापालिकेत समर्थन, शिष्टमंडळासमाेर स्थगितीची घाेषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 08:26 AM2023-04-11T08:26:23+5:302023-04-11T08:28:22+5:30
पालकमंत्री डबलढाेलकी वाजवत असल्याचे काहींनी खासगीत व्यक्त केले...
पुणे : शहरातील एकीकडे ‘वेताळ टेकडी वाचवा, पुणे वाचवा’ची माेहीम राबवत बालभारती ते पौड फाटा रस्त्याला तीव्र विराेध सुरू आहे; तर दुसरीकडे प्रशासनासह पालकमंत्रीही प्रकल्पाबाबत आग्रही असल्याचे दिसले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साेमवारी (दि. १०) महापालिकेत १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत विविध प्रकल्प मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. यात पर्यावरणवाद्यांसह माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचा समाचार घेत लोकशाहीत ‘हम करे सो कायदा’ चालत नाही, असे सुनावले. दुसरीकडे संध्याकाळी घरी आलेल्या ‘वेताळ टेकडी वाचवा’च्या शिष्टमंडळासमाेर संबंधित प्रकल्पांना तूर्त स्थगिती देत असल्याचे जाहीर केले. यावरून पालकमंत्री डबलढाेलकी वाजवत असल्याचे काहींनी खासगीत व्यक्त केले.
वेताळ टेकडीच्या निमित्ताने चिघळलेला प्रश्न साेडविण्यासाठी पर्यावरणवादी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. १९८७ पासून हा विषय चर्चेत आहे, त्यामुळे डोक्यावर आभाळ पडले आहे; या पद्धतीने त्याची लगेच निविदा काढली पाहिजे असे काही नाही, असेही पाटील म्हणाले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेत बाेलावलेल्या या बैठकीस आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे यांच्यासह १५ क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त, परिमंडळाचे उपायुक्त उपस्थित होते. या बैठकीनंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महापालिकेने अडीचशे कोटी रूपये खर्च करून वेताळ टेकडी फोडून रस्ता करण्याचा घाट घातला आहे. त्यास नागरिकांनी प्रचंड विरोध सुरू केला आहे. पर्यावरणप्रेमी नागरिकांचा विरोध वाढत असताना भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनीही नागरिकांना पाठिंबा देत हा प्रकल्प होऊ देणार नाही, असे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी विविध प्रकल्प मार्गी लावण्याची भूमिका मांडली हाेती. मागील सव्वावर्षापासून महापालिकेवर प्रशासकराज आहे. लोकप्रतिनिधीच नसल्याने क्षेत्रीय कार्यालयांच्या कामावर चर्चा झाली नाही. त्यामुळेच ही बैठक घेतली. स्वच्छता, मलनिस्सारण, पावसाळी गटारांची स्वच्छता, नाले सफाई यासह इतर विषयांवर चर्चा झाली, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
बालभारती ते पौड फाटा प्रस्तावित रस्त्याला विरोध करणाऱ्या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. पालकमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले असून, महापालिका प्रशासनासमवेत त्यांचे या संदर्भातील सादरीकरण बघण्यात येणार आहे.
- संदीप खर्डेकर, प्रवक्ता, भाजप महाराष्ट्र प्रदेश.
माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संवाद साधण्यासाठी पुढाकार घेत बैठक घेतली. त्यात आम्ही आमची बाजू मांडली. पाटील यांना वृत्तपत्रांतून सर्व माहिती मिळालेली होती. त्यामुळे ते म्हणाले की, महापालिकेला सदर प्रकल्प थांबविण्यासाठी सांगतो. महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर याविषयी निर्णय होईल. पण डीपीमधून प्रस्ताव काढला जात नाही, तोपर्यंत आमचा विरोध सुरूच असेल.
- सुमिता काळे, सदस्य, वेताळ टेकडी बचाव कृती समिती