प्रचाराच्या धामधुमीतही पालकमंत्र्यांचा उत्साह

By admin | Published: February 18, 2017 03:05 AM2017-02-18T03:05:40+5:302017-02-18T03:05:40+5:30

जिल्ह्यात ठिकठिकाणी सहा सभा... शहरातही तीन सभांचे नियोजन... शेकडो किलोमीटरचा प्रवास... पुण्यासह पिंपरी-चिंचवड आणि सातारा

Guardian Minister's enthusiasm even during campaigning | प्रचाराच्या धामधुमीतही पालकमंत्र्यांचा उत्साह

प्रचाराच्या धामधुमीतही पालकमंत्र्यांचा उत्साह

Next

राजानंद मोरे / पुणे
जिल्ह्यात ठिकठिकाणी सहा सभा... शहरातही तीन सभांचे नियोजन... शेकडो किलोमीटरचा प्रवास... पुण्यासह पिंपरी-चिंचवड आणि सातारा जिल्ह्यातील प्रचाराचे पालकत्व घेतलेले; त्यामुळे सातत्याने नेत्यांची फोनाफोनी सुरूच... कुणाला काय हवे-नको, याची विचारपूस... चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप... कामाचा प्रचंड व्याप.. रात्री साडेनऊपर्यंत सात सभा उरकल्यानंतर पुन्हा उमेदवार, कार्यकर्त्यांच्या मेळ्यात ते रमून जातात. पण, प्रचाराच्या या धामधुमीतही वयाची साठी पार केलेले पालकमंत्री गिरीश बापट यांचा उत्साह सतत चिरतरुण. न थकता काम करण्याची त्यांची हातोटी तरुण कार्यकर्त्यांना प्रेरणादायी अशीच. ‘काम करण्याची इच्छाशक्ती’ हे त्यांच्या उत्साहाचे एकमेव कारण...
कार्यकर्त्यांमध्ये भाऊ म्हणून प्रसिद्ध असलेले बापट यांचा गुरूवारचा संपूर्ण दिवस सभांमध्येच गेला. नेहमीप्रमाणे त्यांच्या दिवसाची सुरवात सकाळी लवकर होते़ पुजाअर्चा झाल्यावर वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांवर ते झरझर नजर फिरवितात़ एखाद्या बातमी लक्षात आल्यावर ती बारकाई वाचतात़ सकाळी सात वाजल्यापासूनच त्यांच्या कामाला सुरुवात होते़ जिल्ह्यातील चार तालुक्यांत प्रचार सभांचे नियोजन ठरलेले. निघण्यापुर्वी नेहमीप्रमाणे दिवसभराच्या कामाची यादी एका कागदावर तयार... त्यावर एक नजर टाकून काही कामे हातासरशी मार्गी लागतात. मग लगेच भाऊंचा गाड्यांचा ताफा जुन्नरच्या दिशेने रवाना होतो. निघायला थोडा उशीर झाल्याने नाश्त्याचा डबा सोबत घेतात.
पहिली सभा जुन्नर तालुक्यातील सावरगावात. जात असताना वाटेत फोनाफोनी सुरू असते़ वाटेत लागणाऱ्या गावातील एखाद्या कार्यकर्त्याची आठवण आली की त्याला फोन होतो, चौकशी केली जाते़
ही सभा संपवून ते शिरूर तालूक्यातील केंदूर येथील सभेला निघतात. इथेही भाषणात तोच उत्साह... सभा संपेपर्यंत जेवणाची वेळ होते. मग याच गावात कार्यकर्त्यांसोबत जेवणाची पंगत रंगते. कार्यकर्त्यांसोबत स्थानिक भागाची माहिती घेत जेवण उरकून लगेच पुढच्या सभेची तयारी... तसरी सभा कळूस येथे तर चौथी खेड तालुक्यातील वासोली गावात... तोपर्यंत दुपारचे चार वाजलेले. पण वासोलीतील सभेतही भाऊंचा उत्साह कणभर कमी झालेला नव्हता. तितक्याच जोरकसपणे विरोधकांवर आसूड ओढत ते ही सभाही जिंकतात. पुढची सभा मावळातील सोमाटणे फाटा येथे असते. गाडीतून गप्पा मारत जात असतानाच शहराध्यक्ष योगेश गोगावले यांचा फोन येतो. केंद्रीय मंत्री वैंकय्या नायडू यांच्या सभेच्या नियोजनाबाबत चर्चा होते. पुन्हा गप्पा सुरू. एकापाठोपाठ एक अशा चार सभा आणि प्रवासामुळे चेहऱ्यावर थोडासा थकवा दिसत होता. त्यातही सकाळी केलेल्या कामाच्या यादीकडे पुन्हा लक्ष जाते. पूर्ण झालेल्या कामे न्याहाळत असतानाच त्यांना डुलकी लागते. पण सभेचे ठिकाण येताच भाऊंचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. तोच जोश, तोच उत्साह...
चांदखेड हे सहाव्या सभेचे ठिकाण... फटाक्यांची आतषबाजी आणि महिलांकडून औक्षण करून भाऊंचे स्वागत होते. पुण्यातली पहिली सभा सायंकाळी सातची ठरलेली. पण उशीर झाल्याने थेट शेवटच्या जनता वसाहतीतील सभेकडे ताफा निघतो. मधे प्रभाग क्रमांक ३३ मधील उमेदवारांची भेट घेवून भाऊ सभेला पोहचतात. तोपर्यंत रात्रीचे साडेनऊ वाजलेले़ तेथील समस्यांवर बोलत लोकांच्या नाडीला हात घालतात़ सभा संपवून ते प्रभाग ३० मधील निवडणुक कार्यालयात उमेदवार व कार्यकर्त्याच्या गराड्यात जातात... दिवसभराचा ताण विसरून पुन्हा नव्या उमेदीने जिंकण्याच्या तयारीसाठी...

Web Title: Guardian Minister's enthusiasm even during campaigning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.