लोहगावात दहशत माजविणारा गुड रोहन गायकवाड स्थानबद्ध
By विवेक भुसे | Published: January 21, 2024 03:35 PM2024-01-21T15:35:39+5:302024-01-21T15:36:37+5:30
आरोपीवर मागील ५ वर्षांमध्ये त्याच्याविरुद्ध ८ गंभीर गुन्हे दाखल
पुणे : खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगून लोहगाव परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करुन त्याला स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.
रोहन अशोक गायकवाड (वय २५, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. रोहन गायकवाड याने साथीदारासह लोहगाव परिसरात पिस्टल, तलवार, पालघन, कोयता अशा घातक हत्यारांसह खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत, अपघात बेकायदेशीर अग्निशस्त्र व हत्यारे बाळगणे अशा सारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षांमध्ये त्याच्याविरुद्ध ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.
विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे व पीसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला. पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन गायकवाड याला एक वर्षासाठी अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी दहशत निर्माण करणारे व सक्रीय अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए अन्वये स्थानबद्धतेच्या ९० कारवाया केल्या आहेत.