अंध कलाकारांच्या हस्ते उभारली गुढी
By admin | Published: March 29, 2017 02:37 AM2017-03-29T02:37:55+5:302017-03-29T02:37:55+5:30
अखिल भारतीय नाट्य परिषद कोथरूड शाखेच्या वतीने गुढी व नटराजपूजनाचा कार्यक्रम झाला. ‘अपूर्व मेघदूत’ या नाटकातील
पुणे : अखिल भारतीय नाट्य परिषद कोथरूड शाखेच्या वतीने गुढी व नटराजपूजनाचा कार्यक्रम झाला. ‘अपूर्व मेघदूत’ या नाटकातील अंध कलाकार प्रवीण पाखरे, तेजस्विनी भालेकर, अद्वैत मराठे, लैला भागवत यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.
या वेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर उपस्थित होते. ते म्हणाले, ‘कोथरूड नाट्य परिषदेच्या वतीने होणारा उपक्रम अतिशय स्तुत्य असून डोळसांना प्रकाश देणारा आहे.’
कोथरूड भागातील नगरसेवक मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘पुणे महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांग मुलांसाठी विविध उपक्रम आयोजित केले जातील.’ तेजस्विनी भालेकर म्हणाली, ‘नाट्यक्षेत्रामध्ये रंगमंचावर काम करताना आम्हाला अनेक अनुभव आले. पण आजचा अनुभव सर्व कलाकारांना वेगळाच आनंद व अनुभव देणारा आहे, तो आमच्या आयुष्यभर लक्षात राहणारा असेल. अपूर्व मेघदूत या नाटकाच्या निर्मात्या रश्मी पांढरे आपला मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, की आज खरंच या सर्व कलाकारांना एकत्र आणून समाजापुढे एक वेगळाच संदेश पोहोचविला आहे.
नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. या वेळी डॉ. माधवी वैद्य, निकिता मोघे, एकपात्री कलावंत संतोष चोरडिया, समीर हंपी, सत्यजित धांडेकर, दीपक गुप्ते, योगेश सोमण, वंदन नगरकर, अभिनेते रमेश परदेशी, नगरसेवक पृथ्वीराज सुतार असे विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. तेंडुलकर यांच्या हस्ते अंध कलाकारांचे सत्कार करण्यात आले. सत्यजित धांडेकर यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)