गुडन्यूज, मान्सून केरळमध्ये पोहोचला
By Admin | Published: June 8, 2016 12:32 PM2016-06-08T12:32:16+5:302016-06-08T15:02:34+5:30
संपूर्ण देश आतुरतेने ज्याची प्रतिक्षा करत आहे तो मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये पोहोचल्याची घोषणा केली आहे.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ८ - संपूर्ण देश आतुरतेने ज्याची प्रतिक्षा करत आहे तो मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये पोहोचल्याची घोषणा केली आहे. केरळमध्ये कन्नूरपर्यंत मान्सून पोहोचला आहे.
मान्सूच्या पुढील प्रगतीला पोषक वातावरण असल्याने हवामान विभागाने म्हटले आहे. साधारणतहा मान्सून केरळमध्ये पोहोचल्यानंतर आठवडयाभराने महाराष्ट्रात पोहोचतो. हवामान अनुकूल राहिले तर, पुढच्या आठवडयाभरात मान्सून गोव्यातून महाराष्ट्रात दाखल होईल.
केरळमध्ये मागच्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु होती. त्यामुळे कुठल्याही क्षणी मान्सूनच्या आगमनाची घोषणा होईल अशी शक्यता होती. आज सकाळी हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाची वर्दी दिली. गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात खोळंबलेल्या मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. कोकणात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत.
आधी मान्सून एक जूनला दाखल होईल असे भाकीत वर्तवण्यात आले होते. मात्र अंदमानात मान्सून रखडण्याची चिन्हे दिसल्यानंतर सात जूनपर्यंत मान्सून केरळात पोहोचले असा अंदाज वर्तवण्यात आला होता. ९ ते ११ जूनदरम्यान दक्षिण कोकण व गोव्यातील काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़
मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागात, मालदीव -कोमोरीन क्षेत्र आणि नैर्ऋत्य व आग्नेय बंगालच्या उपसागराच्या भागात झाली आहे. मागील २४ तासांत कोकण, गोवा व विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला.
कोकणातील फोंडा येथे सर्वाधिक १३० मिमी पावसाची नोंद झाली़ वेंगुर्ला ९०, पणजी ७३, दोडामार्ग व मालवण येथे प्रत्येकी ६० मिमी पावसाची नोंद झाली़ दाभोलीम, मडगाव, सांगे, मार्मागोवा, केपे येथे जोरदार पाऊस झाला़ कुडाळ, म्हापसा, वाल्पोई, सावंतवाडी येथेही सरी बरसल्या.
मराठवाडा व विदर्भातही काही भागात मान्सूनपूर्व पाऊस झाला. लक्षद्वीप, अंदमान-निकोबार, पोर्ट ब्लेअर, केरळ येथे सध्या चांगला पाऊस सुरू असून कर्नाटक, आंध्र प्रदेश किनारपट्टी भागात पाऊस सुरू झाला आहे़