पेन्शन योजनेसाठी तृतीयपंथीयांचा मेळावा, तहसीलदार अर्चना यादव यांनी केले मार्गदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 10:43 PM2017-12-10T22:43:02+5:302017-12-10T22:43:13+5:30
पुणे : तृतीय पंथीयांसाठी असलेल्या पेन्शन योजनेची माहिती देण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून समपथिक ट्रस्टमध्ये तृतीय पंथीयांचा मेळावा घेण्यात आला.
पुणे : तृतीय पंथीयांसाठी असलेल्या पेन्शन योजनेची माहिती देण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून समपथिक ट्रस्टमध्ये तृतीय पंथीयांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये तहसीलदार अर्चना यादव आणि नायब तहसीलदार विलास भनावसे यांनी मार्गदर्शन केले. दारिद्र्यरेषेखालील लोकांसह गरजूंसाठीच्या सामाजिक अर्थसहाय्य योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या सूचनांनुसार मोहिम हाती घेण्यात आली आहे.
बुधवार पेठेतील समपथिक ट्रस्टच्या कार्यालयामध्ये शुक्रवारी तृतीयपंथीयांसाठी मेळावा घेण्यात आला. समाजातील वंचितांसाठी असलेल्या योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. संजय गांधी निराधार योजना ही तृतीयपंथीयांनाही लागू असून त्यांच्यामध्ये जागरुकता आणण्याची आवश्यकता आहे. अनेकदा त्यांच्यामध्ये असलेल्या न्यूनगंडामुळे शासनदरबारी त्यांना न्याय मागताना आत्मविश्वास कमी पडतो. यावेळी यादव यांनी तृतीयपंथियांशी संवाद साधून त्यांच्या समस्याही समजावून घेतल्या. तृतीयपंथीयांसाठी घेतले गेलेला हा पहिलाच मेळावा होता.
यावेळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष बिंदूमाधव खिरे यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच या मेळाव्यामागील भूमिका समजावून सांगितली. यादव आणि भनावसे यांनी पेन्शन योजनेबाबतची सविस्तर माहिती दिली. यावेळी योजनेचा लाभ मिळावा म्हणून तृतीयपंथीयांचे अर्ज भरून घेण्यात आले. तर अनेकांना या अर्जांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रकल्प समन्वयक मिलींद पळसकर उपस्थित होते. येत्या दोन आठवड्यात अधिकाधिक तृतीयपंथीयांचे अर्ज ट्रस्टमार्फत भरून घेतले जाणार आहेत.
=============
राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना, घटस्फोटीत महिला पेन्शन योजना, अत्याचारीत महिला पेन्शन योजना, वेश्याव्यवसाय मुक्त महिला पेन्सन योजना, परीत्यक्ता महिला पेन्शन योजना, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब सहाय्य पेन्शन योजना, अनाथ मुले-मुली योजना, तृतीयपंथी पेन्शन योजना यासोबतच दुर्धर आजारग्रस्त योजना राबविण्यात येत आहेत. परंतु, या योजनाच ख-या लाभार्थ्यांना माहिती नाहीत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न प्रशासनामार्फत केला जात आहे.
==========
आगामी काही दिवसाताच अपंगांचे मेळावे घेतले जाणार आहेत. त्या ठिकाणीच संबंधितांना अपंगत्त्वाचे प्रमाणपत्र आणि अपंग निवृत्ती वेतन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. एक जानेवारी ते १० जानेवारी २०१८ या कालावधीत संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठका घेण्यात येणार असून वंचितांना लाभ देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे तहसीलदार अर्चना यादव यांनी सांगितले.