ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून राज्यभरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:14 AM2021-08-12T04:14:56+5:302021-08-12T04:14:56+5:30
समर्थ इन्स्टिट्यूट व विज्ञान अध्यापक संघाचा उपक्रम --- खोडद : समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट बेल्हे व जुन्नर तालुका विज्ञान ...
समर्थ इन्स्टिट्यूट व विज्ञान अध्यापक संघाचा उपक्रम
---
खोडद : समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट बेल्हे व जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दीड वर्षापासून राज्यभरातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी राज्यस्तरीय समाज उपयोगी वेबिनारचे आयोजन करण्यात येत असून, आतापर्यंत विविध विषयावर १०० पेक्षा अधिक ऑनलाईन व्याख्याने झाली आहेत. राज्यातील दहा जिल्ह्यांतील शिक्षक, पालक व विद्यार्थी असे १५ हजारपेक्षा अधिक जणांना या वेबिनारचा फायदा झाला आहे.
'शाळा बंद, पण शिक्षण चालू' या उपक्रमांतर्गत या ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या ऑनलाईन वेबिनारमध्ये पिंपळवंडीचे ग्रामस्थ व सध्या अमेरिकेत असणारे शास्त्रज्ञ डॉ. दिनेश पायमोडे यांनी रेमडीसिवियर औषध निर्मितीची गाथा सर्वांना समजावून सांगितली. डॉ. सदानंद राऊत यांनी ग्रामीण भागातील सर्पदंशाचे प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन केले. पुण्यातील एन.सी.आर.ए. वरिष्ठ अधिकारी डॉ. जे. के. सोळंकी यांनी दहावी-बारावी नंतरच्या करिअर वाटा याविषयी मादर्शन केले.
प्रा. विनय र. र. यांनी घरातील साहित्यांव्दारे वैज्ञानिक प्रयोग प्रात्यक्षिक दाखविले. यशोगाथा या सदरात कलेक्टर, भारतीय सैनिक, शिक्षणाधिकारी, उद्योजक यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. गणिताशी मैत्री, इंग्रजी विषयाशी मैत्री यावर व्याख्याने झाली. यासह पर्यावरण संरक्षण व संवर्धन, झाडांचे जीवनातील महत्त्व, छत्रपती शिवाजी महाराजांची जलनीती तसेच शिवनीती, गणिताचा इतिहास, शिष्यवृत्ती परीक्षेचा कानमंत्र, दैनंदिन जीवनात संत-साहित्यातील विचारांची गरज या विषयावर स्त्री संतांचे जीवन या मालिकेत डॉ. लता पाडेकर यांनी या वेबिनारमध्ये अनेक पुष्पे गुंफली.
वेबिनारचे नियोजन इन्स्टिट्यूटचे विश्वस्त प्रा. वल्लभ शेळके, अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. रतीलाल बाबेल, जुन्नर तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण ताजणे, प्रा. प्रदीप गाडेकर, प्रा.भूषण बोऱ्हाडे यांनी केले.
================================
कोरोना कालावधीत प्रत्येकाची मनस्थिती बदलणे, जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्यासाठी चांगले विचार पोहोचविणे गरजेचे होते. या आजाराची मनात असणारी भीती दूर करून दैनंदिन कृती अधिक आनंदाने करण्यासाठी प्रवृत्त करणे, कलागुणांना वाव देणे, करिअरची संधी समजावून सांगणे आदी उद्देश डोळ्यांसमोर ठेवून या वेबिनारचे आयोजन केले होते.
- प्रा. वल्लभ शेळके,
विश्वस्त, समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे, बेल्हे
================================