१०वीच्या विद्यार्थ्यांना यू-ट्यूबवरून मार्गदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 05:19 AM2018-12-05T05:19:56+5:302018-12-05T05:20:02+5:30
यंदापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तरपत्रिकांऐवजी कृतिपत्रिका दिल्या जाणार आहेत.
पुणे : यंदापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तरपत्रिकांऐवजी कृतिपत्रिका दिल्या जाणार आहेत. बालभारतीकडून या कृतिपत्रिका सोडविण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. ६ डिसेंबरपासून ते यू-ट्यूबवरील बालभारती वाहिनीवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
दहावीचा अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०१८-१९) बदलण्यात आला आहे. प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपामध्येही मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. विद्यार्थ्यांनी घोकंपट्टी करून पाठ केलेले उत्तरपत्रिकांमध्ये उतरविण्याऐवजी त्यांना विचार करण्यास प्रवृत्त करावे, त्यांची मते नोंदवावीत यासाठी कृतिपत्रिका देण्यात येणार आहे.
या कृतिपत्रिकांचे सराव प्रश्नसंच ई-बालभारतीच्या संकेतस्थळावर २६ नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या कृतिपत्रिका सोडविण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्हिडीओ बालभारतीने तयार केले आहेत. येत्या ६ डिसेंबरपासून ते यू-ट्यूबवरील बालभारतीच्या वाहिनीवर उपलब्ध केले जाणार आहेत अशी माहिती बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांनी सराव कृतिपत्रिका सोडविल्यानंतर त्यांच्या कुठे चुका झाल्या त्या या व्हिडीओ पाहून दुरूस्त करता येणार आहेत. सर्व विषयांचे व्हिडीओ विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.
६ डिसेंबर रोजी सर्व प्रथम भाषा विषयांचे व्हिडीओ उपलब्ध होतील. ७ रोजी द्वितीय भाषा विषयांचे तर ८ रोजी तृतीय भाषा विषयांचे व्हिडीओ उपलब्ध होतील.
>१४ डिसेंबरला भूगोल
यूट्यूबवर ९ रोजी विज्ञान भाग १, १० डिसेंबर रोजी विज्ञान भाग २, ११ रोजी गणित भाग १, १२ रोजी गणित भाग २, १३ रोजी इतिहास आणि राज्यशास्त्र, तर १४ डिसेंबर रोजी भूगोल या विषयांचे व्हिडीओ उपलब्ध करून दिले जाणार आहेत.