GBS disease: गेल्या दहा वर्षांत पुणे स्मार्ट सिटी म्हणून किती विकसित झालं, हे तपासायला हवं;सुप्रिया सुळे संतापल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 10:56 IST2025-01-30T10:53:21+5:302025-01-30T10:56:07+5:30
सुप्रिया सुळे महापालिकेच्या भूमिकेवर केले प्रश्न उपस्थित

GBS disease: गेल्या दहा वर्षांत पुणे स्मार्ट सिटी म्हणून किती विकसित झालं, हे तपासायला हवं;सुप्रिया सुळे संतापल्या
पुणे: खडकवासला आणि नांदेड परिसरात ‘जीबीएस’ (गिलन बॅरी सिंड्रोम) आजाराच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. दूषित पाण्यामुळे हा आजार वाढत असल्याचा संशय असून, प्रशासन यावर योग्य उपाययोजना करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
सुळे म्हणाल्या, "मी गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेसोबत पाठपुरावा करत आहे. पाणीपुरवठा सुरळीत आणि स्वच्छ असायला हवा. अनेक ठिकाणी एसटीपी प्लांट कार्यरत आहेत, तरीही प्रदूषण वाढतच आहे. सरकारने गांभीर्याने लक्ष घालावे. यासाठी गोखले इन्स्टिट्यूटकडून अभ्यास अहवाल तयार करून घ्यायला हवा."
सरकार अपयशी, निधी गैरवापराचा आरोप
सुळे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या भूमिकेवरही टीका केली. "करोडो रुपये सरकार पाठवते, मात्र ते कुठे जातात? याचा हिशोब नाही. मोठा हिस्सा सल्लागार आणि ब्रोकरकडे जातो. गेल्या दहा वर्षांत पुणे स्मार्ट सिटी म्हणून किती विकसित झालं, हे तपासायला हवं. समस्या वाढत असताना प्रशासन कुठे कमी पडतंय?" असा सवाल त्यांनी केला.
आरोग्य मंत्र्यांना फोन, सरकारवर टीका
सुळे पुढे म्हणाल्या, "मी आजच आरोग्य मंत्र्यांना फोन करून डिटेल रिपोर्ट मागवणार आहे. सरकार आणि महापालिका अधिकारी वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत. लोकांचे आरोग्य धोक्यात घालणारे सरकार जबाबदार नाही का? फक्त एकच हॉस्पिटल का, इतर ठिकाणीही उपचार उपलब्ध व्हायला हवेत."
पाणीपट्टी वाढवू देणार नाही, आंदोलनाचा इशारा
महापालिकेच्या नियोजनावर नाराजी व्यक्त करत सुळे म्हणाल्या, "सरकार नागरिकांच्या सेवेसाठी आहे की फक्त दादागिरी आणि खंडणीसाठी? आम्ही पाणीपट्टी वाढवू देणार नाही. याविरोधात तीव्र आंदोलन करू."
दरम्यान, केंद्रीय पर्यावरण मंत्री लवकरच राज्य सरकारसोबत प्रदूषण आणि दूषित पाण्याच्या मुद्द्यावर चर्चा करणार असून, त्याच वेळी सुळे यांनीही यावर सविस्तर माहिती घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.