दोषी अधिकाऱ्यांची चौकशी होणार

By admin | Published: May 5, 2015 03:14 AM2015-05-05T03:14:12+5:302015-05-05T03:14:12+5:30

तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोषी पोलिसांवर कडक कारवाई करण्यात येईल

Guilty officials will be questioned | दोषी अधिकाऱ्यांची चौकशी होणार

दोषी अधिकाऱ्यांची चौकशी होणार

Next

पुणे : तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोषी पोलिसांवर कडक कारवाई करण्यात येईल. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह सेनादत्त पोलीस चौकीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी करणार असल्याचे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी सांगितले. पोलिसांच्या दडपशाहीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. पोलीस आयुक्तांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी ३०७ कलमानुसार गुन्हा नोंदवला आहे.
धनंजय शिवाजी मोरे (रा. नवी पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. अभिजित मच्छिंद्र मारणे (२६, रा. नवी पेठ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. २५ एप्रिलला सकाळी साडेआठच्या सुमारास अभिजितवर धनंजयने हल्ला केला होता.
मारणे कुटुंबीयांवर पोलिसांकडून होत असलेल्या अन्यायाला ‘लोकमत’ ने वाचा फोडल्यानंतर सोमवारी पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. पोलीस आयुक्तांनी दखल घेत स्थानिक पोलिसांची कानउघाडणी केली. त्यांच्या सूचनांनुसार तातडीने खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र सावंत यांनी पथकासह ससून रुग्णालयात जाऊन अभिजितची विचारपूस करून वैद्यकीय उपचारांची कागदपत्रे ताब्यात घेतली. त्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहणीही केली. मोरेला अटक केली आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास पोलीस चौकीकडून काढून तपास पथकाकडे दिला आहे.

Web Title: Guilty officials will be questioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.