गुजरात जाएंटसचा यु मुम्बावर विजय; प्रो कबड्डी लीग : अखेरच्या सेकंदाला गुजरात जाएंटसची ३४-३३ अशी बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 12:29 PM2024-12-10T12:29:19+5:302024-12-10T12:29:50+5:30
गुजरात संघाचा १७व्या सामन्यातील हा पाचवाच विजय ठरला.
पुणे : चढाईपटू गुमान सिंग आणि राकेश यांनी केलेले सुपर टेन आणि यु मुम्बाला बचावाच्या आघाडीवर आलेल्या अपयशाचा पूर्ण फायदा उठवत गुजरात जाएंटस संघाने प्रो कबड्डी लीगच्या ११व्या पर्वात रविवारी यु मुम्बाचा अखेरच्या सेकंदाला ३४-३३ असा पराभव केला. गुजरात संघाचा १७व्या सामन्यातील हा पाचवाच विजय ठरला. मुम्बा मात्र विजय मिळवून दुसरा क्रमांक गाठण्यात अपयशी ठरले.
पुणेकर अजित चौहानच्या तुफानी चढायांच्या जोरावर यु मुम्बाने सामन्यात आव्हान राखले होते. पण, त्याला चढाईत पूरक साथ मिळू शकली नाहीत. त्यातच मुम्बाचा बचावही फिका पडला होता. संपूर्ण सामन्यात मुम्बाला बचावात केवळ ५ गुण मिळवता आले. तुलनेत राखीव खेळाडू म्हणून उतरलेल्या रोहितने बचावात हाय फाईव्ह करत सुपर टेन साजरे करणाऱ्या गुमान सिंग आणि राकेशला सुरेख साथ केली आणि गुजरातला अखेर विजयाचा क्षण अनुभवता आला.
उत्तरार्धात पुन्हा एकदा अजित चौहानच्या चढायांनी यु मुम्बाने गुजरात जाएंटसवर पूर्वार्धात बाकी राहिलेला लोण देत २०-१७ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर गुमान सिंगने डु और डाय लढतीत रिंकू आणि परवेश भैन्सवालला टिपत गुजरातला २२-२२ अशी बरोबरी साधून दिली. नंतर राकेशने आपले सुपर टेन पूर्ण करताना मुम्बाला लोणच्या उंबरठ्यावर आणले. पण, पुन्हा एकदा राखीव खेळाडू रोहित राघवने पहिल्या चढाईत गुण मिळवत उत्तरार्धातील पहिले सत्र संपले तेव्हा २४-२४ असा बरोबरीत आणला होता.
दुसऱ्या प्रयत्नात मात्र रोहितला यश आले नाही. सोमवीरने त्याची पकड करत यु मुम्बावर लोण देत पुन्हा एकदा २८-२५ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर अजित चौहानने अव्वल चढाई करत सामना ३१-३१ असा बरोबरीत आणला. अखेरच्या मिनिटाला रोहित राघवची पकड करून गुजरातने ३३-३२ अशी एका गुणाची आघाडी राखली. अखेरची काही सेकंद असताना डु और डाय चढाईत राकेशची पकड करून यु मुम्बाने सामना ३३-३३ असा बरोबरीत आणला. अखेरच्या डु और डाय चढाईत गुजरातने मनजीतची पकड करून विजय साकार केला.
पूर्वार्धात गुजरात जाएंटसने यावेळी गुमान सिंगच्या अपयशानंतरही राकेशच्या चढायांच्या जोरावर आव्हान राखले होते. यु मुम्बाने अपेक्षित अशा अजित चौहानच्या चढायांनी गुजरात जाएंटसच्या बचावफळीला तगडे आव्हान दिले. पण, राकेशला रोखताना मुम्बाच्या बचावफळीचाही कस लागत होता. राकेशने पूर्वार्धातील अखेरच्या टप्प्यात सलग तीन चढाया आणि एक अव्वल पकड करत गुजरातवर बसणारा लोण परतवून लावला. यामुळे त्यांना मध्यंतराला १६-१५ अशी निसटती का होईना एक गुणाची आघाडी मिळवता आली. पूर्वार्धात मुम्बाचा बचाव साफ फिका पडला होता. त्यांना केवळ दोनच गुण मिळवता आले होते.