संमेलनाला गुजरातने मदत करावी; भारत देसडला यांची मागणी; नरेंद्र मोदी यांना पाठविले पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:23 PM2017-12-29T12:23:44+5:302017-12-29T12:28:33+5:30
घुमान येथे झालेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पंजाब सरकारने सर्वतोपरी साहाय्य केले होते. प्रकाशसिंग बादल यांनी या संमेलनाला राज्य सरकारचा अधिकृत दर्जा दिला होता.
पुणे : घुमान येथे झालेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पंजाब सरकारने सर्वतोपरी साहाय्य केले होते. प्रकाशसिंग बादल यांनी या संमेलनाला राज्य सरकारचा अधिकृत दर्जा दिला होता.
हीच परंपरा पुढे नेत गुजरात सरकारने बडोदा येथे होत असलेल्या ९१ व्या साहित्य संमेलनाला राज्य सरकारचे अधिकृत संमेलन म्हणून सर्वतोपरी मदत करावी, अशा आशयाचे पत्र ८८ व्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री रुपाणी यांनाही पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरहद संस्थेतर्फे आयोजित ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आणि संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या घुमानला पंजाब सरकारने मदतीचा हात दिला होता. या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने बडोद्यातील संमेलनाला मदत करावी, अशी विनंती देसडला यांनी मोदी यांना केली आहे.
बडोद्याला १६ ते १८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत सयाजीराव गायकवाड यांच्या भूमीत संमेलन होत आहे. गुजरात ही आपली कर्मभूमी असल्याने या माध्यमातून सरकारने संमेलनाला अधिकृत दर्जा देऊन मदत केल्यास गुजरात आणि महाराष्ट्रातील सबंध अधिक दृढ होतील.
सयाजीराव गायकवाड यांच्या घराण्यातील राजमाता शुभांगिनी राजे गायकवाड या ९१ व्या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष आहेत. त्यामुळे या संमेलनाला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
यासाठी गुजरात सरकारने पुढाकार घेतल्यास संमेलनाच्या परंपरेत नवा इतिहास घडू शकेल आणि घुमानप्रमाणे हे संमेलनही यशस्वी होईल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
साहित्यिक कलावंत संमेलनातही मागणी
साहित्यिक कलावंत संमेलनात संजय नहार यांनीही या मुद्दा अधोरेखित केला होता. ते म्हणाले, 'बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावेळी गुजरात सरकारने देखील उदारमतवादी धोरण ठेवले पाहिजे. महाराष्ट्राने पंजाबला नामदेव दिले, त्याचप्रमाणे मराठीभूमीने गुजरातला सयाजीराव गायकवाड दिले आहेत. कला आणि साहित्याविषयी महाराजा सयाजीराव गायकवाडांना खूप आस्था होती. पंतप्रधानदेखील गुजरातचेच असल्यामुळे आगामी संमेलनाविषयी मराठी बांधवांच्या अपेक्षा उंचावणे स्वाभाविक आहे.'