सचिन अंदुरेला अमाेल काळे यानेच पिस्तूल पुरवले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 03:38 PM2018-09-06T15:38:32+5:302018-09-06T15:40:18+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेकडून जप्त करण्यात आलेले पिस्तूल अमोल काळे यानेच पुरवले असल्याची माहिती समाेर अाली अाहे.
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेकडून जप्त करण्यात आलेले पिस्तूल अमोल काळे यानेच पुरवले असल्याची माहिती समाेर अाली अाहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी काळे याला 14 दिवसांची सीबीआय कोठडी द्यावी अशी मागणी सीबीआय च्या वकिलांनी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम एस ए सय्यद यांनी काळे याची 14 सप्टेंबर पर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी केली.
काळे याच्या कोठडीची मागणी करताना ढाकणे यांनी न्यायालयाला सांगितले की, उच्च न्यायालयाने या प्रकरणाबाबत एक आदेश दिला असून न्यायालयात सुनावणी न होता संबंधित केसमधील केस डायरी, न्यायालयानत सादर करण्यात यावी त्यानुसार न्यायालयाने निर्णय दयावा. त्यामुळे सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला नाही. या प्रकरणातील तपास संवेदनशील असून त्यात करण्यात आलेल्या तपासाची माहिती माध्यमांना जाऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आल्याचे समजते.
एखाद्या प्रकरणात आरोपीला अटक केली असताना कोठडी दिल्यानंतर त्याकडे दुसऱ्याच प्रकरणाची चौकशी केली जाते. अंदुरे हा बंगळुर पोलिसांच्या कोठडीत असताना त्याच्याकडे दाभोलकर प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. ज्या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे त्याच प्रकरणाचा त्याकडे तपास करावा असा गुजरात उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा निर्वाळा यावेळी ॲडव्होकेट धर्मराज यांनी दिला. चौदा दिवसांची पोलीस कोठडी दिल्यास आरोपीकडे दुसऱ्याच प्रकरणांची चौकशी करण्यात येईल, त्यामुळे त्याला कमीत कमी कोठडी द्यावी, अशी मागणी धर्मराज यांनी केली.
फाॅरेन्सिक अहवालाचा रिपोर्ट येणार असल्याचे कारण देत पोलिसांनी अनेकदा रिमांडची मागणी केली आहे. यापूर्वी अटक आरोपी सचिन अंदुरे 14 दिवस सीबीआय कोठडीत असताना सीबीआयने काय तपास केला याचा न्यायालयाने पोलीस कोठडी देताना विचार करावा. अशी मागणीही धर्मराज यांनी केली.