गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावल्या; पुण्यात राष्ट्रवादीकडून पोलिसात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 03:42 PM2022-04-21T15:42:13+5:302022-04-21T15:42:39+5:30
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे
पुणे : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. सदावर्ते यांनी मराठा समाजाच्या आरक्षण विषयाला धरून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे अकोला, कोल्हापूर याठिकाणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात ९ सप्टेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पुणे पोलीस त्यांना अटक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजीनगर पोलीस स्टेशनला सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सदावर्ते यांच्या वक्तव्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे दोघा पती - पत्नीवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी तक्रार अर्जातून केली आहे.
तक्रार अर्जात काय नमूद केले आहे
डॉ जयश्री पाटील यांनी यु ट्यूबवर गुणरत्न सदावर्ते यांचा व्हिडिओ प्रसारित केला असून त्यामध्ये सदावर्ते यांनी मराठा समाजाची उत्पत्ती कशी झाली ते कुठून आले यावर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केली आहे. त्यांच्या या भाषेने महाराष्टातील तमाम मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामध्ये जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न दोघांनी केला आहे. भारतीय संविधानाने जरी बोलण्याचे अधिकार दिलेले असले तरी त्यांना मर्यादा दिलेली आहे. ती गुणरत्न सदावर्ते व त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी ओलांडली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडावी आणि जाती जातीमध्ये वाद लावून समाजात अराजकता माजेल या प्रकारचे कृत्य हे दोघे करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणे कामी गुन्हा दाखल करावा. हि विनंती करणारा अर्ज पोलिसांना देण्यात आला आहे.